वाळू माफियांनी पीएसआयला चिरडल्‍याप्रकरणी बिहारचे मंत्री म्‍हणाले, “अशा घटना काही नवीन नाहीत” | पुढारी

वाळू माफियांनी पीएसआयला चिरडल्‍याप्रकरणी बिहारचे मंत्री म्‍हणाले, "अशा घटना काही नवीन नाहीत"

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील जमुई जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) प्रभात रंजन यांना चिरडले. ते गढी पोलीस स्‍टेशनचे प्रभारी होते. वाळू माफियाच्‍या हल्‍ल्‍यात दोन होमगार्डही जखमी झाले होते. या प्रकरणी राज्‍यात खळबळ उडाली असताना बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.

अशा घटना सतत घडत असतात

जमुईच्या माहुलिया तांड गावात वाळू माफियांनी पोलीस उपनिरीक्षक प्रभात रंजन यांना ट्रक्‍टरखाली चिरडले. ते सिवान जिल्ह्यातील रहिवासी होते. या घटनेवर ‘इंडिया टूडे’शी बोलताना बिहारचे शिक्षण मंत्री चंदशेखर म्‍हणाले की, “अशा घटना काही नवीन नाहीत. या सतत घडत असतात. अशा घटना यापूर्वी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात घडल्या आहेत.”

प्रभात रंजन यांच्या पश्चात चार वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांचा मुलगा आहे. नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांची पत्नी सध्या दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल आहे. वाळू माफियांच्‍या हल्‍ल्‍यात जखमी झालेले होमगार्ड जवान राजेश कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जमुईचे पोलीस अधीक्षकशौर्य सुमन यांनी सांगितले की, या घटनेत सहभागी असलेल्या मिथिलेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. मात्र, कृष्णा असे ट्रॅक्टरचा चालक फरार झाला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून चालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जमुईचे खासदार चिराग पासवान यांचा राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल

जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्‍लाबोल केला. वाळू माफियांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नितीशकुमार त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे नदीत बुडून लोकांचा मृत्यू होत आहे, तर अनियंत्रित वाहने सुरक्षा दलांना चिरडत आहेत. राज्यातील वाळू तस्करांविरुद्ध कोणतीही “ठोस पावले” का उचलली गेली नाहीत, असा सवालही त्‍यांनी केला.

काही दिवसांपूर्वी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात वाळू माफियांनी एका पोलीस हवालदाराची ट्रक्‍टरने चिरडून हत्या केली होती.

हेही वाचा :

Back to top button