Uttarkashi Tunnel Collapse : जगण्याची लढाई युद्धपातळीवर : बोगद्यात अडकलेले सर्व ४० मजूर सुरक्षित

Uttarkashi Tunnel Collapse : जगण्याची लढाई युद्धपातळीवर : बोगद्यात अडकलेले सर्व ४० मजूर सुरक्षित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा ते दंडलगाव मार्गावरील काम सुरू असलेला बोगद्याचा भाग कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. बोगद्यात ४० हून अधिक मजूर अडकले आहेत. बोगदा कोसळून ३० तासांहून अधिक काळ लोटला असून सर्व ४० मजूर सुरक्षित आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव पथकांनी १५ मीटरपेक्षा जास्त ढिगारा हटवला आहे. ३५ मीटरपेक्षा जास्त स्लॅब काढणे अजूनही सुरू आहे.

संबंधित बातम्या : 

उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस कर्मचारी बचाव कार्य करत आहेत. ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यासोबतच या पाईपलाईनद्वारे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्न व पाणी पाठविण्यात आले आहे.

चार धाम रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तराखंड ते यमुनोत्रीचे अंतर २६ कि.मी.ने कमी करणारा साडेचार कि.मी. अंतराचा हा बोगदा तयार करण्याचे काम सुरू होते. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या बोगद्याचा २५० मीटरचा भाग अचानक कोसळला. त्यावेळी या बोगद्यात ४० हून अधिक मजूर काम करीत होते. बोगद्याच्या तोंडाशी असलेले ढिगारे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून एसडीआरएफ आणि पोलीस यांची पथके दिवसभर जीवाचे रान करून आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याची शिकस्त करीत आहेत. तोंडापासून आतपर्यंत डोंगराचा भाग त्या स्लॅबवर कोसळला आहे. तो स्लॅब काढण्याचे कठीण काम सुरू आहे. एचआयडीसीएल कंपनीकडे या टनेल निर्मितीचे काम देण्यात आले आहे. (Uttarakhand Tunnel Crash)

सर्व मजूर सुरक्षित!

उत्तरकाशीचे मंडळ अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, "बोगद्यात ४० लोक अडकले आहेत. सर्व सुरक्षित आहेत, आम्ही त्यांना ऑक्सिजन आणि पाणी पुरवले आहे. आम्ही बोगद्याच्या आत अडकलेल्या लोकांशी संवाद साधला. बोगद्याच्या आत सुमारे २५ मीटर पर्यंत बचावपथक पोचले आहे. सुमारे ३५ मीटर अद्याप बाकी आहे. बोगद्याच्या आत जाण्यासाठी आमचा मार्ग तयार करत आहोत."

ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यश

बचाव पथकाला स्लॅबच्या खालील एका फटीतून ऑक्सिजनचे पाईप आत ढकलण्यात यश आले. त्या मदतीने आत अडकलेल्या मजुरांना प्राणवायू मिळत राहणार आहे. दरम्यान ऑक्सिजननंतर आता पाणी आणि अन्नाची पाकिटे पुरवठा पाईपमधून पुरवण्यात आली आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बोगदा दुर्घटनेच्या जागेची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, "बचाव कार्य आणि मलबा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. जेवणाची पाकिटे आत पाठवण्यात आली आहेत. आम्ही तज्ञांशी बोलत आहोत. तपास सुरू आहे. सर्वांची सुखरूप सुटका करणे हे आमचे प्राधान्य आहे."

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news