Delhi Air Pollution: दिल्लीकरांना दिलासा ! पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली | पुढारी

Delhi Air Pollution: दिल्लीकरांना दिलासा ! पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात शुक्रवारी (दि.११) काही भागांमध्ये हलका पाऊस झाला, या पावसामुळे दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजधानीतील वाढत्या वायू प्रदूषणापासून दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक ४५० वरून २२५ पर्यंत म्हणजे जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. (Delhi Air Pollution)

Delhi Air Pollution: दिल्ली सरकारकडून ‘कृत्रिम पावसाची’ पडताळणी

दरम्यान, दिवाळी सणानंतर पुन्हा प्रदूषण वाढु नये, या चिंतेने दिल्ली सरकारने शहरात ‘दिवे लावा, फटाके नाही’ या मोहिमेची घोषणा केली आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी २० नोव्हेंबरच्या सुमारास ‘कृत्रिम पावसाची’ पडताळणी दिल्ली सरकारच्या वतीने सुरू आहे.  दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, “पाऊस आणि वाऱ्यामुळे प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे. जवळपासच्या शहरांतील लोकांनी दिवाळीत दिवे लावावेत आणि मिठाई वाटावी, मात्र फटाके वाजवु नयेत. असे आवाहन त्यांनी केले आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही प्रदूषणाची पातळी चांगली राहावी, असे प्रयत्न आहेत.  (Delhi Air Pollution)

‘दिवे लावा, फटाके नाही’ मोहीम आजपासून सुरू

सरकारच्या वतीने ‘दिवे लावा, फटाके नाही’ ही मोहीम आजपासून सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. गोपाल राय यांनी उत्तर प्रदेशच्या परिवहन मंत्र्यांना पत्र लिहून हवेतील प्रदूषणाची परिस्थिती लक्षात घेऊन उत्तर प्रदेशच्या सीमेवरून दिल्लीत येणे आवश्यक नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचीही विनंती केली आहे. (Delhi Air Pollution)

आरोग्य मंत्रालयाकडून देखील खबरदारी

दिल्ली सरकारने प्रदूषणविरोधी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्र्यांनाही मैदानात उतरवले आहे. सध्या, राष्ट्रीय राजधानीत प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात खराब हवेच्या गुणवत्तेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही दिल्ली आणि दिल्लीच्या शेजारच्या राज्यांना आवश्यक तयारी करण्यास सांगितले आहे. तसे पत्र दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या आरोग्य विभागांना लिहिण्यात आले आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सकाळी फीरणे टाळा, फटाके वाजवु नका, सार्वजनिक वाहतूकीच्या पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. (Delhi Air Pollution)

हेही वाचा:

Back to top button