Maharashtra pollution: मुंबईतील रस्ते धुतले जातील; वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचा निर्णय | पुढारी

Maharashtra pollution: मुंबईतील रस्ते धुतले जातील; वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचा निर्णय

पुढारी ऑनलाईन: मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील.  मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरिता एक हजार टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेथ पथक नियुक्त करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबईतील रस्ते धुतले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. राज्यातील प्रदूषण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आला, यानंतर ते आज (दि.९) माध्यमांशी बोलत होते. (Maharashtra pollution)

राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. देशभरात सध्या पर्यावरण हा गंभीर विषय आहे. वाढते तापमान आणि याच्या घातक परिणामांची चर्चा सध्या देशात सुरु आहे. राज्यातील सध्याच्या प्रदूषण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षानिवासस्थानी आज (दि.९) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यावेळी प्रदूषणावर चर्चा झाली. दरम्यान अनेक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra pollution)

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील प्रदूषणासंदर्भातील सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान गरज भासल्यास मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील. तसेच एमएमआरडीइची बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्याचे शिंदे यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले आहे.

Maharashtra pollution : ‘प्रदूषणमुक्त दीपावली

दरम्यान ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान -2023’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. ८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याचा संकल्प करण्याची शपथ दिली. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते. प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

हेही वाचा:

 

Back to top button