पुढारी ऑनलाईन डेस्क : "माझे संपूर्ण आयुष्य पत्नीशिवाय व्यतीत झाले आहे. आधी माझे लग्न करा. मला हुंडा म्हणून साडेतीन लाख रुपये रोख हवे आहेत. तसेच रेवा जिल्ह्यातील सिंगरौली टॉवर किंवा समदरिया येथे फ्लॅटसाठी कर्ज मंजूरी हवी आहे," अशी अजब मागणी मध्य प्रदेशमधील एका शिक्षकाने केली असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. ( MP teacher skips poll duty ) जाणून घेवूया हे नेमकं प्रकरण काय आहे याविषयी…
मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रशासन या निवडणुकीच्या तयारती व्यस्त आहे.राज्यातील सर्व शिक्षकांना निवडणूक ड्युटी देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सतना जिल्ह्यातील अमरपाटन येथील महुदर उच्च माध्यमिक विद्यालय या सरकारी शाळेतील ३५ वर्षीय संस्कृतीचे शिक्षक अखिलेश कुमार मिश्रा यांनाही आला.
विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी संबंधित कर्मचार्यांसाठी १६ ते १७ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला मिश्रा यांनी दांडी मारली. त्यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यात आपण निष्काळजीपणा दाखवला आहे. आपणास निलंबित का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस त्यांना बजावण्यात आली.
अखिलेश यांनी नोटीसला ३१ ऑक्टोबर रोजी उत्तर दिले. त्यांच्या पत्राचे शीर्षक होते 'पॉइंट टू पॉइंट रिप्लाय'. यामध्ये अखिलश मिश्रा यांनी म्हटलं आहे की, माझं संपूर्ण आयुष्य पत्नीशिवाय व्यतीत झाले आहे. आधी माझे लग्न करा. हुंडा म्हणून मला 3.5 लाख रुपये रोख हवे आहेत. तसच रेवा जिल्ह्यातील सिंगरौली टॉवर किंवा समदरिया येथे फ्लॅटसाठी कर्ज मंजूरी करा, अशी मागणीही त्यांनी नोटीसीला दिलेल्या उत्तरात केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सतनाचे जिल्हाधिकारी अनुराग वर्मा यांनी गंभीर दखल घेतली. अखिलेश मिश्रा यांना २ नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईप्रकरणी मिश्रा यांची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. मात्र त्यांच्या एका सहकार्याने सांगितले की, लग्न होत नसल्याने मागील काही महिने अखिलेश मिश्रा हे तणावाखाली आहेत. नाहीत तर एवढं विचित्र उत्तर कारणे दाखवा नोटीसीला कोण देणार? असा सवाल करत वर्षभरापासून अखिलेश मिश्रा यांनी मोबाईल फोन वापरणंही बंद केल्याचे संबंधितांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :