नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महादेव बेटिंग ॲपमधून (Mahadev betting app case) छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये मिळाल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कारवाईच्या आधारे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांनी आज हा आरोप केला. तसेच भूपेश बघेल सत्तेत राहून 'सट्टेबाजीचा खेळ' खेळत असल्याची तोफ डागली. काँग्रेस पक्ष छत्तीसगड मध्ये निवडणूक प्रचारात सट्टेबाजांनी हवालातून आणलेल्या पैशाचा वापर करत असल्याचा दावाही स्मृती इराणी यांनी केला.
संबंधित बातम्या
मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, की बेकायदेशीर सट्टेबाजी करणार्यांनी काही अधिकाऱ्यांना ६४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम कायद्यापासून संरक्षण व्हाव या हेतूने दिल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या म्हणाल्या की, आरोपींचे व्हॉईस मेसेज आणि विधाने आहेत ज्यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी सट्टेबाजीच्या पैशाचा होत असलेला वापर आणि बघेल यांना दिलेला मलिदा यांचा संबंध जुळून येत आहे कारण ज्या असीम दासकडून ५०० कोटीहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे त्यानेच कबूल केले आहे की त्यांना निवडणूक खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश दिले होते. पैसे सट्टेबाजीचे असल्याची कबुली असीम दासने दिली असल्याकडेही स्मृती इराणी यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, या सर्व आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना त्रास देत असल्याचे म्हटले आहे.