केजरीवालांना तपास यंत्रणा २ नोव्हेंबर रोजी अटक करेल : ‘आप’ नेत्‍या आतिशी यांनी व्‍यक्‍त केली भीती

केजरीवालांना तपास यंत्रणा २ नोव्हेंबर रोजी अटक करेल : ‘आप’ नेत्‍या आतिशी यांनी व्‍यक्‍त केली भीती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी चौकशी केल्‍यानंतर मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्‍तवसुली संचालनायल (ईडी) 2 नोव्‍हेंबर रोजी अटक करेल, अशी भीती आम आदमी पार्टीच्‍या ( आप ) नेत्‍या आणि दिल्‍लीच्‍या मंत्री अतिशी यांनी आज ( दि. ३१ ऑक्‍टोबर) व्यक्त केली. भाजपकडून आपला संपविण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

आम आदमी पार्टी संपविण्‍याचा भाजपचा प्रयत्‍न

'पीटीआय'शी बोलताना अतिशी यांनी सांगितले की, आम आदमी पार्टीच्‍या प्रमुख नेत्‍यांना कारागृहात पाठवून पक्ष संपविण्‍याचा भाजपचा प्रयत्‍न आहे. अरविंद केजरीवाल यांच निवडणुकीत पराभव करता आला नाही त्‍यामुळे आता भाजप 'आप'विरोधात असे डाव रचत असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला.

भाजपविरोधात बोलले म्हणून ही कारवाई असेल

केजरीवाल यांना 2 नोव्हेंबरला अटक होणार असल्याचे वृत्त आहे. त्यांना अटक झाली तर ते भ्रष्टाचाराच्‍या आरोपांमुळे नसून भाजपविरोधात बोलले म्हणून ही कारवाई असेल. आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दोनदा पराभव केला आणि एमसीडी निवडणुकीतही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना घाबरले आहेत. भाजपला माहित आहे की ते निवडणुकीत आपचा पराभव करू शकत नाहीत, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

सोमवार ३० ऑक्‍टोबर रोजी ईडीने दिल्ली मद्य धोरण घोटळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना समन्स जारी केले आहे. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता केजरीवाल यांना दिल्लीतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्‍याचे आदेश दिले आहेत. केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांची चौकशी केली होती.

इंडिया आघाडीतील इतर नेत्यांनाही भाजप लक्ष्य करेल

केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर भाजप सीबीआय आणि ईडीचा वापर करून इंडिया आघाडीतील गटातील इतर नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करेल, असा आरोपही आतिशी यांनी केला. केजरीवाल यांना अटक केल्‍यानंतर भाजप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लक्ष्य करतील. कारण ते त्यांना पराभूत करू शकले नाहीत. त्यानंतर बिहारचे उपमुख्‍यमंत्री तेजस्वी यादव हे टार्गेटवर असतील. कारण ते बिहारमधील जनता दल संयुक्‍त आणि राष्‍ट्रीय जनता दलाची युती तोडू शकले नाहीत. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना लक्ष्य केले जाईल," असा दावाही अतिशी यांनी 'पीटीआय'शी बाेलताना केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news