Gold prices | दिवाळीत सोन्याची चमक कमी होऊ शकते, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने सांगितले कारण | पुढारी

Gold prices | दिवाळीत सोन्याची चमक कमी होऊ शकते, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने सांगितले कारण

पुढारी ऑनलाईन : शुद्ध सोन्याचा दर (Gold prices) आज मंगळवारी (दि. ३१) प्रति १० ग्रॅम ६१, २०० रुपयांवर आहे. दरम्यान, सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सणासुदीत भारतात सोन्याच्या खरेदीचे प्रमाण कमी होऊ शकते, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (World Gold Council) म्हटले आहे. सोन्याची वाढती किंमत मागणीवर लक्षणीय परिणाम करू शकते. परिणामी, तीन वर्षांतील सर्वात कमी खरेदी होऊ शकते, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नमूद केले आहे.

संबंधित बातम्या 

आज मंगळवारी शुद्ध सोन्याचा दर (२४ कॅरेट) प्रति १० ग्रॅम ६१,२३८ रुपयांवर खुला झाला. सोन्याचा दर विक्रमी उच्चांकाजवळ पोहोचला आहे. पण मौल्यवान धातू सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या भारतामध्ये खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या जागतिक किमतीतील तेजी थांबू शकते आणि रुपयाला आधार देताना भारताची व्यापार तूट कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

डब्ल्यूजीसीचे भारतातील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पीआर यांनी म्हटले आहे की, डिसेंबर तिमाहीत उच्चांकी दरामुळे सोन्याची खरेदी कमी होऊ शकते. भारतात सोन्याची मागणी विशेषतः वर्षाच्या अखेरीस वाढते. कारण या काळात लग्नसराई तसेच दिवाळी आणि दसरा यासारखे सण असतात.

दरम्यान, काल सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६१,३३६ रुपयांवर गेला होता. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा दर उच्चांकी ६१,८४५ रुपयांवर गेला होता. सध्याचा दर हा या वर्षीच्या उच्चांकाजवळ पोहोचला आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीत सोन्याचा दर या वर्षीच्या दरापेक्षा जवळपास २० टक्क्यांनी कमी होता.

सध्याच्या किमतींचा बाजारावर लक्षणीय परिणाम

डिसेंबर तिमाहीत सोन्याची मागणी गेल्या वर्षीच्या २७६.३ मेट्रिक टनांपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमसुंदरम यांनी पुढे म्हटले आहे की, सध्याच्या किमतींचा बाजारावर लक्षणीय परिणाम होतो. तरीही, दिवाळी सणादरम्यान किमतीत मोठी घसरण झाल्यास परिस्थिती बदलू शकते. दिवाळीचा सण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आहे.

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याचा खप १० टक्क्यांनी वाढून २१०.२ मेट्रिक टन झाला आहे. तर जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सोन्याची मागणी ३.३ टक्क्यांनी कमी होऊन ४८१.२ मेट्रिक टन झाली आहे, ज्यामुळे वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मागणी मंदावल्याचे दिसून येते.

दर वाढल्याने जुन्या दागिन्यांची विक्री

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे काहींनी त्यांच्याकडील जुने दागिने आणि नाणी विकली आहेत. परिणामी वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत स्क्रॅप पुरवठा ३७ टक्क्यांनी वाढून ९१.६ टन झाला, असे रॉयटर्सने WGC आकडेवारीचा हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

आजचा दर काय?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६१,२३८ रुपयांवर खुला झाला आहे. तर २२ कॅरेटचा दर ५६,०९४ रुपयांवर आहे. (Gold prices)

Back to top button