भाजपरूपी रावणाचे दहन करण्यासाठी मुश्रीफांना मुद्दामहून त्यांच्याकडे पाठवले : जयंत पाटील | पुढारी

भाजपरूपी रावणाचे दहन करण्यासाठी मुश्रीफांना मुद्दामहून त्यांच्याकडे पाठवले : जयंत पाटील

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा :  बेरोजगारी आणि महागाई वाढवणार्‍या सध्याच्या भाजपरूपी रावणाचे दहन करण्यासाठी हसन मुश्रीफ यांना ‘मुद्दामहून रावणा’च्या जवळ पाठवले असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपचे नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

यावेळी त्यांनी नवीन वर्षभरातील वाईट गोष्टींचे दहन करून चांगली सुरुवात करण्यासाठी दसर्‍याच्यानिमित्ताने सर्वांनी मिळून भाजपरूपी रावणाचे दहन करूया, असेही आवाहन केले. येथील जवाहरनगर परिसरातील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या वतीने दसरा महोत्सवाचे आयोजन केले होते. याचा प्रारंभ जयंत पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी पाटील म्हणाले, इचलकरंजी शहराचे अनेक प्रश्न आहेत. साध्या यंत्रमागापासून ते अत्याधुनिक यंत्रमागधारकांचे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. मागील वर्षभरात महागाईने परमोच्च बिंदू गाठला असून, बेकारीचाही कळस झाला आहे. वीज, गॅस दरवाढीने जनता हैराण आहे. या प्रश्नांचे प्रतीकात्मक दहन करून नवीन सुरुवात करूया. त्यासाठीच भाजपरूपी रावणाचे दहन करण्यासाठी हसन मुश्रीफ यांना मुद्दाम रावणाजवळ पाठवल्याचेही वक्तव्य त्यांनी केले.

ट्रस्टचे अध्यक्ष बाजीराव कुंभार यांनी स्वागत केले. संदीप मुळीक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सीमोल्लंघन तसेच सोने लुटण्याच्या कार्यक्रमानंतर रावण दहन झाले. यावेळी महिला, अबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button