पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्धमुळ जगावर चिंतेचे ढग दाटले आहेत. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत दोन्ही बाजूचे सुमारे 4500 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. दरम्यान, भारतात इस्राईल-पॅलेस्टाईन समर्थन यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्राईल समर्थनात घेतलेल्या भुमिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी टीका केली. या टीकेला प्रतित्यूतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. (Bawankule vs Pawar)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईलच्या समर्थनार्थ उभे राहिले म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी दहशतवादासारख्या संवेदनशील विषयावर बेजबाबदार भूमिका घेणं निंदनीय आहे. दहशतवाद कुठलाही असो तो पक्षीय राजकारणाचा मुद्दा होऊच शकत नाही; पण दुर्दैवाने ते पॅलेस्टाईनच्या दहशतवादाचं समर्थन करीत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रानं प्रथम काँग्रेसच्या आणि नंतर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या राजवटीत दहशतवादाच्या महाभयानक झळा भोगल्या आहेत.
या दहशतवादामुळे आपल्या देशाने खूप काही गमावले देखील आहे. देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषविलेल्या पवार साहेबांसारख्या राष्ट्रीय नेत्याला हे कटू वास्तव सांगावे लागत असेल तर ती दुर्दैवी बाब आहे. शरद पवार साहेब मतांसाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करीत आहेत.हे निषेधार्ह आहे."