Rahul Gandi Targets Adani: कोळसा आयातीतून अदानींचा १२ हजार कोटींचा भ्रष्टाचार; राहुल गांधींचा उद्योगपती अदानींवर पुन्हा हल्लाबोल | पुढारी

Rahul Gandi Targets Adani: कोळसा आयातीतून अदानींचा १२ हजार कोटींचा भ्रष्टाचार; राहुल गांधींचा उद्योगपती अदानींवर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अदानी प्रकरणावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी आज (दि.१८) नवा हल्ला चढविला. अदानींनी कोळसा आयातीतून जनतेचे १२ हजार कोटी रुपये लुटले असल्याचा आरोप राहुल यांनी केला. अदानी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात आणि भारतात पोहोचताना या कोळशाचा दर दुप्पट होतो, असा दावा देखील राहुल गांधींनी केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि उद्योगपती अदानींच्या संबंधांवरही राहुल गांधींनी भाष्य केले. (Rahul Gandi Targets Adani)

Rahul Gandi Targets Adani: आता एकूण ३२ हजार कोटींचा भ्रष्टाचार

कॉंग्रेस मुख्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी अदानी प्रकरणावरून जोरदार हल्ला चढवला. वादग्रस्त हिंडेनबर्ग रिपोर्टचा आडवळणाने संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, आतापर्यंत केवळ २० हजार कोटी रुपयांबद्दल प्रश्न विचारले जात होते की, हा पैसा कोणाचा आहे आणि कुठून आला. पण आता नवीन माहिती समोर आली आहे. २० हजार कोटी रुपयांचा आकडा अपूर्ण असून, त्यात १२ हजार कोटी रुपये आणखी जोडले असून एकूण रक्कम ३२ हजार कोटी रुपये झाली आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. (Rahul Gandi Targets Adani)

संबंधित बातम्या:

अदानी समुहाला केंद्र सरकारकडून संरक्षण

अदानी इंडोनेशियामधून कोळसा खरेदी करतात आणि हा कोळसा भारतात पोहोचतो तेव्हा त्याची किंमत दुप्पट होते. अशाप्रकारे अदानींनी जवळपास १२ हजार कोटी रुपये देशातील जनतेच्या खिशातून लुटले आहेत. मात्र, अदानी समुहाला केंद्र सरकारकडून संरक्षण मिळते आहे, असेही पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

जनतेला महाग वीज मिळण्यामागे अदानी समूहाचा हात

राहुल गांधींनी “अदानी आणि कोळशाच्या गूढ किमतींमध्ये वाढ” या प्रसारमाध्यमांमधील वृत्ताचा दाखला देत दावा केला की अदानींनी कोळसा आयातीत हेराफेरी करून १२ हजार कोटी रुपयांचा अपहार केला आहे. जनतेला महाग वीज मिळण्यामागे अदानी समूहाचा हात आहे. अदानींना हवे ते मिळते. सर्वांना माहिती आहे की अदानींनी भ्रष्टाचार केला आहे. मात्र प्रश्न उपस्थित करूनही त्यांची चौकशी होत नाही. यामागे कोणते रहस्य आहे, असा सवालही राहुल गांधींनी केला.

 शरद पवार पंतप्रधान असते तर…

दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेते असलेले शरद पवार आणि उद्योगपती अदानींच्या संबंधांवर विचारलेया प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी आपले प्रश्न पंतप्रधानांना उद्देशून असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की मी शरद पवारांना हे प्रश्न विचारलेले नाहीत कारण ते पंतप्रधान नाहीत. शरद पवार अदानींची पाठराखण करत नसून, पंतप्रधान मोदी पाठराखण करत आहेत. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला. शरद पवार पंतप्रधान असते आणि अदानींचा बचाव त्यांनी केला असता तर हे प्रश्न शरद पवार यांना विचारले असते, अशी टिप्पणी राहुल गांधींनी यावेळी केली.

हेही वाचा:

 

 

Back to top button