पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी महुआ मोईत्रा लाच घेतात, असा आरोप दुबे यांनी केला आहे. भाजप खासदाराच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, मोईत्रा यांनीही आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. महिला खासदार महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म – X वरून भाजप खासदाराला प्रत्युत्तर दिले आहे. निशिकांत दुबे यांच्याकडे एमबीए आणि पीएचडी या बनावट पदव्या असल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला आहे. (Mahua Moitra)
महुआ मोईत्रा यांच्या निलंबणाची मागणी (Mahua Moitra)
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची आणि त्यांना सभागृहातून 'तात्काळ निलंबित' करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. 'महुआ संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात.' असे दुबे यांनी म्हटले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील नव्या राजकीय लढतीची ही सुरुवात मानली जात आहे. (Mahua Moitra)
महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मोईत्रा आणि हिरानंदानी यांच्यामध्ये रोख रक्कम आणइ भेटवस्तूंची देवाणघेवाण झाल्याचा दावा भाजप खासदाराने केला आहे. दरम्यान, निशिकांत दुबे यांच्या आरोपांना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मोईत्रा म्हणाल्या, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांना अदानी प्रकरणाचा तपास केल्यानंतर मोकळा वेळ मिळाला तर माझ्याकडेही तपासासाठी यावे, असा उपाहासात्मक टोलाही मोईत्रा यांनी लगावला आहे. (Mahua Moitra)