

पणजी
गोव्यात दक्षिण गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यात अनेक धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. त्यातील एक म्हणजे कवळे या गावातील श्री शांतादुर्गा देवस्थान. (Shantadurga Temple ) गेली अनेक दशके हे धार्मिक स्थळ देशातील विविध भागांतून विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर भारतीय राज्यांमधून गोव्यात येणार्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. (Shantadurga Temple )
बेळगाव किंवा महाराष्ट्रातून गोव्यात आल्यावर फोंडा भागात प्रवेश करून नंतर नागेशी किंवा फर्मागुडी या मार्गे कवळे येथे येऊन शांतादुर्गा देवस्थानात प्रवेश करता येतो. इथे देशी किंवा विदेशी पर्यटकांसाठी राहण्याची सोय नाही, त्यामुळे त्यांनी फोंडा शहरात खासगी स्वरूपात एखाद्या हॉटेलवर राहण्याची करणे चांगले असते. गोव्याबहेरून शेजारील राज्यातून येणार्या महाजनांना मात्र मंदिराच्या आवारात राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच केरळ या राज्यातून सारस्वत आणि ब्राह्मण समाजातील महाजन रूद्रभिषेक, रूद्र, लघु रूद्र किंवा महारुद्र अशा पूजा अर्चना, किंवा इतर धार्मिक विधी आणि कार्यासाठी देवस्थानात येतात, त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. देवस्थान आवारात चहा, नाश्ता आणि भोजनाची सोय असलेले शुद्ध शाकाहारी शांतादुर्गा कॅन्टीन आहे, ज्यामुळे जेवणाची सोय होऊ शकते.
कवळे येथील शांतादुर्गा देवस्थान ते मुंबईपासून हे अंतर ५८३.८ किलोमीटर एवढे आहे. एखाद्या वाहनाने त्यासाठी ११ तास ४८ मिनिटे लागतात तर रेल्वे प्रवासात १२ तास १३ मिनिटे कालावधी लागतो. देवस्थान ते पुणे हे अंतर ४४०.७ किलोमीटर एवढे आहे. गाडीने ९ तास तर रेल्वेने यायचे झाल्यास १३ तास लागतात. देवस्थान ते संभाजीनगर हे अंतर ७३३ किलोमीटर एवढे आहे. गाडीने १३ तास तर रेल्वेने १६ तासांचा कालावधी लागतो.
श्री शांतादुर्गा देवस्थानात होणारे मोठे उत्सव म्हणजे नवरात्र आणि फेब्रुवारी महिन्यात होणारी जत्रा. येत्या वर्षी हा जत्रोत्सव १२ ते १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. या आवारात शांतादुर्गा देवीचे मुख्य देवस्थान, गणपती देवाचे उपदेवस्थान आणि देवस्थान कमिटीचे कार्यालय असून कार्यालयाच्या शेजारी साड्यांचे दुकान आहे जेथे पर्यटक म्हणून किंवा देव दर्शन वा धार्मिक विधीसाठी आलेल्या महिला आणि क्वचित प्रसंगी पुरुषही खरेदी करताना दिसतात. देवस्थान आवारात पारंपरिक रथ आणि इतर काही साहित्य आणि जुनी बांधकामे पाहायला मिळतात.
या ठिकाणी दर दिवशी सर्वसाधारणपणे ३०० ते ४०० पर्यटक भेट देतात. ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय राज्यांच्या नागरिकांचा सहभाग असतो. देशी पर्यटक आणि भाविकांची इथे गर्दी पाहायला मिळते. पूर्वी विदेशी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत होते. आताही विदेशी पर्यटक येत असेल तरीही कोरोना कालावधीनंतर विदेशी पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या गोवा दौर्यादरम्यान, श्री शांतादुर्गा देवस्थानाला भेट दिली होती, हे विशेष. असे हे शांतादुर्गा देवस्थान देशी-विदेशी पर्यटक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असून एक आकर्षक असे धार्मिक पर्यटनस्थळ आहे.