Land for job scam | नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी लालू यादव आणि कुटुंबियांना जामीन मंजूर | पुढारी

Land for job scam | नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी लालू यादव आणि कुटुंबियांना जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन : नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी लालू यादव आणि कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आरजेडीच्या खासदार मीसा भारती यांना कथित नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. (Land for job scam) या प्रकरणी लालू यादव यांच्यासह राबडी देवी, तेजस्वी यादव आणि मीसा भारती आज राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर झाले होते.

 संबंधित बातम्या 

दिल्ली राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सर्वांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. २००४ ते २००९ दरम्यान रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यांच्या कुटुंबाला नोकरीच्या बदल्यात जमीन विकल्याचा अथवा भेट दिल्याचा आरोप आहे.

६ मार्चला सीबीआयने राबडी देवी यांची पाटणातील निवासस्थानी ३ तास चौकशी केली होती. लालू प्रसाद यादव यांचीदेखील दिल्लीत चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणात १० मार्चला ईडीने यादव तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या घरी छापे टाकले होते.

ऑक्टोबर २०२२ मध्ये लालू आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सीबीआयच्या आरोपपत्रात, मध्य रेल्वेमध्ये नियमांचे, मार्गदर्शक तत्त्वांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून उमेदवारांच्या अनियमित, बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.

सीबीआयने अलीकडेच लालू प्रसाद यांच्यावर खटला चालवण्यास अधिकाऱ्यांकडून आवश्यक मंजुरी मिळाल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने लालू आणि इतरांना बुधवारी समन्स बजावले होते.

हे ही वाचा :

Back to top button