

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात २००४ ते २०१४ या कालावधीत धोरण लकवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला यातून बाहेर काढले. भारताने उत्पादन क्षेत्रात भरारी घेतली आहे. जी–२०, चांद्रयान– ३ मोहिमेचे यश, मिशन आदित्य एल–१ मोहीम आणि महिला आरक्षण विधेयकाला मिळालेली मंजुरी या घटनांनी देशात उत्साह संचारला आहे, असा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला.
दिल्लीत, उद्योजकांची संघटना पीएचडी चेंबरच्या ११८ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी गृहमंत्री शाह यांनी आपले मत व्यक्त केले. आगामी २५ वर्षांचा काळ संकल्पपूर्तीचा आहे, असे सांगताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की ही २५ वर्षे संकल्प घेण्याची आणि संकल्पांना सिद्धीमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आहे. आपल्याला असा देश हवा आहे, ज्याचे स्वप्न मोदींनी दाखविले आहे. स्वातंत्र्याची शतकपूर्ती करताना भारत जगातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांकावर असावा. रायझिंग इंडिया संकल्पना निवडल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी पीएचडी चेंबर्सचे अभिनंदनही केले.
गेल्या ७५ वर्षातील आमची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे लोकशाहीची मुळे मजबूत करण्यात देशाला यश आले आहे, असे सांगताना गृहमंत्री अमित शाह यांनी धोरणांच्या अभावाचा उल्लेख करून आधीच्या युपीए सरकारला चिमटा काढला. ते म्हणाले की आपण गुजरातमध्ये मंत्री असताना भारत सरकारच्या २००४ ते २०१४ पर्यंतच्या सर्व धोरणांचा अभ्यास केला. देशात धोरण लकवा असल्याची स्थिती होती. परंतु, पंतप्रधान मोदींनी अनेक धोरणे बनवली. इलेक्ट्रॉनिक्ससाठीचे राष्ट्रीय धोरण आणले. मेक इन इंडियाची खिल्ली उडवली जायची पण आज जगभरात उत्पादन क्षेत्रात आपण जगभरासाठी ड्रिम डेस्टिनेशन बनलो आहोत. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, जीएसटी, उडान योजना, राष्ट्रीय क्वान्टम मिशन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले, या धोरणांची उदाहरणे देताना गृहमंत्री अमित शाह यांनी या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी पीएचडी चेंबरने समिती तयार करावी, अशी सूचना केली.
जी–२०, चांद्रयान–३ चे यश, मिशन आदित्य एल–वन त्याचप्रमाणे महिला आरक्षण विधेयक मंजूर होणे, या सर्व घटनांनी देशात नवीन उत्साह संचारला आहे. देशाने ७५ वर्षांचा आणि भूतकाळाचा प्रवास पूर्ण केला असून अनेक क्षेत्रात यश मिळविले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःला सिद्ध देखील केले आहे, असेही गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
हेही वाचा