Maneka Gandhi On 'ISKCON' : खासदार मनेका गांधींचा 'इस्कॉन'वर गंभीर आरोप, संस्थेने दिले उत्तर!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: भाजप खासदार मनेका गांधी यांनी जगप्रसिद्ध इस्कॉनवर (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (चेतना)) गंभीर आरोप केले आहेत. मनेका यांनी इस्कॉनवर कसाईंना गायी विकल्याचा आरोप केला आहे. मात्र, इस्कॉनने हा आरोप ‘निराधार आणि खोटा असल्याचे म्हटले आहे.या संदर्भातील पत्र इस्कॉनचे राष्ट्रीय प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून शेअर केले आहे. (Maneka Gandhi On ‘ISKCON’ )
माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मनेका इस्कॉनवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये मनेका गांधी यांनी म्हटले आहे की, इस्कॉन भारतातील सर्वात मोठी फसवणूक करणारी संस्था आहे. त्यांनी गायींचे आश्रयस्थान स्थापन केले, ते चालवण्यासाठी त्यांना शासनाकडून अगणित लाभ मिळतात. त्यांना मोठ्या जमिनी मिळतात, असेही मनेका गांधी यांनी म्हटले आहे. (Maneka Gandhi On ‘ISKCON’ )
Response to the unsubstantiated and false statements of Smt Maneka Gandhi.
ISKCON has been at the forefront of cow and bull protection and care not just in India but globally.
The cows and bulls are served for their life not sold to butchers as alleged. pic.twitter.com/GRLAe5B2n6
— Yudhistir Govinda Das (@yudhistirGD) September 26, 2023
खा. मनेका गांधींच्या आरोपावर इस्कॉनने दिले उत्तर
मनेका गांधी यांनी आमच्या संस्थेवर केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे इस्कॉनने म्हटले आहे. संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते गोविंददास म्हणाले की, “इस्कॉन केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर गाई-बैलांचे संरक्षण आणि काळजी घेण्यात आघाडीवर आहे. आमच्या येथे त्यांची आयुष्यभर सेवा केली जाते.”
Maneka Gandhi On ‘ISKCON’: अनंतपूर गोशाळेला भेट दिल्यानंतर केला दावा
भाजप खासदार मनेका गांधी यांनी व्हायरल व्हिडिओत आंध्र प्रदेशातील इस्कॉनच्या एका गाय आश्रयस्थानाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या, त्यांनी नुकतीत अनंतपूर गोशाळेला भेट दिली होती. तेथे एकही गाय किंवा वासरू दिसले नाही, या ठिकाणी केवळ डेअरीच आहे. याचा अर्थ येथील गाई विकल्या गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इस्कॉन आपल्या सर्व गायी कसाईंना विकत आहे. ते जसे करतात तसे दुसरे कोणीही करत नाही. इस्कॉनने जेवढी गुरे कसायाला विकली असतील, तेवढी कोणीही विकली नसावी, असा आरोप करत गांधी यांनी हे लोक असे करू शकतात, तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार, असेही त्यांनी म्हटले अहे.
६० हून अधिक गोशाळे चालवणारी संस्था : इस्कॉन प्रशासनाची माहिती
इस्कॉन मंदिर प्रशासनाने एका निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यात म्हटले आहे की, इस्कॉन जगातील अनेक भागांमध्ये गायींचे रक्षण करते. मुख्यत: जेथे गोमांस हे मुख्य अन्न आहे. मनेका गांधींच्या विधानाने आम्हाला आश्चर्य वाटत आहे. कारण त्या नेहमीच इस्कॉनच्या हितचिंतक राहिल्या आहेत.’
इस्कॉन भारतात 60 हून अधिक गो आश्रयस्थान चालवत आहे. येथे शेकडो गायी-बैलांचे संरक्षण केले जाते. त्यांची आयुष्यभर काळजीही घेतली जाते.आश्रयस्थानात येणार्या गायी या कत्तलीतून वाचवण्यात आल्या आहेत, असेही इस्कॉनने दावा केला आहे.