ISCON : इस्कॉनकडून उपदेशक 'अमोघ लिला दास' यांच्यावर बंदी; जाणून घ्या कारण | पुढारी

ISCON : इस्कॉनकडून उपदेशक 'अमोघ लिला दास' यांच्यावर बंदी; जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाइन डेस्क : ISCON : इस्कॉनला फोलो करणाऱ्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. इस्कॉनने आपले प्रसिद्ध उपदेशक (भिक्षू) ‘अमोघ लिला दास’ यांच्यावर एक महिन्यासाठी बंदी घातली आहे. या यासंबंधी इस्कॉनने एक निवेदन देखील प्रसिद्ध केले आहे. निवेदनात त्यांनी अमोघ यांना सार्वजनिक जीवनापासून लांब राहून गोवर्धन पर्वतावर प्रायश्चित घेण्याची शिक्षा सुनावली आहे. इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे. जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण…

अमोघ लिला दास हे इस्कॉनचे प्रचारक आहेत. तसेच ते एक लोकप्रिय आध्यात्मिक प्रेरक वक्ते आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका प्रवचना दरम्यान, अमोघ लिला दास यांनी स्वामी विवेकानंद आणि त्यांचे रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी केलेल्या एका टिप्पणीमुळे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांना माननारा एक मोठा वर्ग दुखावला गेला. अनेकांनी अमोघ यांच्या या व्हिडिओवर कठोर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ISCON : स्वामी विवेकानंद यांच्याबाबत काय म्हणाले अमोघ लिला दास

अमोघ लिला दास यांनी त्यांच्या प्रवचना दरम्यान स्वामी विवेकानंदांच्या माशांच्या सेवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले की, सद्गुणी मनुष्य प्राण्याला इजा पोहोचवणारी कोणतीही गोष्ट कधीही खाणार नाही.

“सद्गुणी मनुष्य कधी मासे खाईल का? माशालाही वेदना होतात ना? मग पुण्यवान माणूस मासे खाईल का?” अमोघ लिला दास यांनी जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले. त्यांनी स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यावरही खरपूस समाचार घेतला. या टिप्पण्यांमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आणि इस्कॉनला त्याच्या भिक्षूविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडले.

अमोघ लिला दास यांना गोवर्धन पर्वतावर प्रायश्चित्ताचे व्रत

आपल्या निवेदनात, इस्कॉनने म्हटले आहे की अमोघ लिला दास यांच्या “अयोग्य आणि अस्वीकार्य टिप्पण्यांमुळे आणि या दोन व्यक्तिमत्त्वांच्या महान शिकवणींबद्दल त्यांची समज नसल्यामुळे” दुखावले गेले आहे. तसेच निवेदनात पुढे म्हटले आहे की त्यांच्यावर एक महिन्याच्या कालावधीसाठी इस्कॉनकडून बंदी घातली जाईल.

निवेदनात पुढे नमूद केले आहे की अमोघ लिला दास यांनी “त्यांच्या टिप्पण्यांसाठी क्षमा मागितली होती” आणि “गोवर्धनच्या पर्वतावर एक महिना ‘प्रायश्चित’ (प्रायश्चित) करण्याचे व्रत घेतले आहे”. ते तात्काळ प्रभावाने सार्वजनिक जीवनापासून स्वत:ला पूर्णपणे वेगळे करतील, असे त्यात म्हटले आहे. ISCON

हे ही वाचा :

नाशिक : आजपासून इस्कॉन मंदिरात चंदन यात्रेस प्रारंभ

नाशिक : इस्कॉन मंदिरात गोपाष्टमी, गोवर्धन पूजेचा उत्साह

Back to top button