Congress : राजस्थानात कॉंग्रेसला धक्का, ज्योती मिर्धा यांचा भाजप प्रवेश | पुढारी

Congress : राजस्थानात कॉंग्रेसला धक्का, ज्योती मिर्धा यांचा भाजप प्रवेश

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : कॉंग्रेसचे दिवंगत दिग्गज नेते नाथूराम मिर्धा यांची नात आणि कॉंग्रेसच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राजस्थानमधील ऐन विधानसभा निवडणुकीच्या हंगामात ज्योती मिर्धा यांनी भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय हा सत्ताधारी कॉंग्रेसला धक्का मानला जात आहे. (Congress )

भाजपच्या केंद्रीय मुख्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये ज्योति मिर्धा यांनी राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह आणि प्रदेशाद्यक्ष सी. पी. जोशी यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत  माजी आयपीएस अधिकारी आणि कॉंग्रेस नेते सवाई सिंह यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. राजस्थानच्या जाट बहुल क्षेत्रामध्ये दिवंगत कॉंग्रेस नेते नाथूराम मिर्धा यांच्या घराण्याचे वर्चस्व आहे. त्याच जोरावर २००९ च्या काळात ज्योति मिर्धा नागोर मधूनलोकसभेवर निवडून गेल्या होत्या. अर्थात, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ज्योती मिर्धा यांना पराभव पत्करावा लागला होता. २०१९ च्या निवडणुकीत लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख हनुमान बेनिवाल नागोरमधून विजयी झाले होते.

राजस्थानात जाट मतांचे प्रमाण ९ टक्के आहे. त्यामुळे,  भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाने लोकसभा निवडणुकीत ज्योती मिर्धा यांना नागोरमधून लोकसभेची उमेदवारी मिळेल, असे मानले जात आहे. यासोबतच, भाजपलाही विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची हक्काची मतपेढी मानल्या जाणाऱ्या जाट मतदारांमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळणार आहे. कॉंग्रेसचे प्रमुख जाट नेता आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा हे मिर्धा कुटुंबाचे नातेवाईक आहेत.
हेही वाचा 

Back to top button