पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्णरोखे योजनेच्या (Sovereign Gold Bond Scheme) २०२३ च्या सप्टेंबर सीरिजसाठी सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ५,९२३ रुपये निश्चित केली आहे. ही सीरिज गुंतवणुकीसाठी आज खुली होत असून ती १५ सप्टेंबर रोजी बंद होईल. ही केंद्र सरकारची योजना असून ती सोन्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात गुंतवणूक करण्याची सुविधा देते.
हे रोखे सोन्याच्या ग्रॅममध्ये दिले जातात आणि एक ग्रॅमच्या पटीत जारी केले जातात. सार्वभौम सुवर्णरोखे योजनेत किमान एक ग्रॅम गुंतवणूक करता येते. तर प्रति आर्थिक वर्ष (एप्रिल ते मार्च) कमाल मर्यादा ५०० ग्रॅम प्रति व्यक्ती इतकी आहे. ट्रस्ट आणि इतर संस्थांसाठी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २० किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतात.
ऑनलाइन अर्ज करणार्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट पूर्ण करणार्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यापेक्षा प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत आहे. या गुंतवणूकदारांसाठी ही योजना प्रति ग्रॅम ५,८७३ रुपये सोन्याच्या इश्यू किमतीवर उपलब्ध करण्यात आली आहे.
सार्वभौम सुवर्णरोखे योजनेचा कालावधी आठ वर्षांचा आहे. या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना वार्षिक २.५ टक्के फिक्स्ड रेटनुसार व्याज मिळते. हे व्याज वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये दिले जाते. गोल्ड बाँडवरील व्याज प्राप्तिकर कायदा, १९६१ (१९६१ चा ४३) च्या तरतुदीनुसार करपात्र राहते. जर तुम्हाला या आधीच पैसे काढायचे असतील तर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढू शकता. (Sovereign Gold Bond Scheme)
सार्वभौम सुवर्णरोखे योजनेतंर्गत सोने विक्री शेड्यूल्ड कमर्शियल बँका (छोट्या वित्त बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) द्वारे केली जाते.
हे ही वाचा :