नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील झोपडपट्टी भागांना पडद्यामागे झाकण्यात आले आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांना आणि जनावरांना डांबून ठेवण्यात आले आहे. यावरून केंद्र सरकारवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आपल्या पाहुण्यांपासून भारताची वास्तविकता लपवण्याची गरज नाही. (G 20 Summit New Delhi)
काँग्रेसने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये G20 दोन दिवसीय शिखर परिषदेपूर्वी काही झोपड्या हिरव्या पडद्यांनी झाकलेल्या दिसत आहेत. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना हटवण्यासाठी क्रूरतेचा वापर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये अनेक लोक यावरून सरकारवर टीका करत आहेत. युरोप दौऱ्यावर गेलेले राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे, भारत सरकार आमच्या गरीब लोकांना आणि प्राण्यांना लपवत आहे. आपल्या पाहुण्यांपासून भारताची वास्तविकता लपवण्याची गरज नाही. (G 20 Summit New Delhi)
काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनीही या प्रकरणावर पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. रमेश यांनी म्हटले आहे की, जी-२० चा उद्देश जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांना एकत्रित करणे आहे. ज्याचा उद्देश जागतिक समस्यांवर सहयोगात्मक पद्धतीने तोंड देणे आहे. परंतु, पंतप्रधानांची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी भटक्या प्राण्यांना क्रुरपणे पकडून त्यांच्याशी दुर्व्यवहार करण्यात आला आहे.रम्यान, काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडिओवर झोपडपट्टीतील एका रहिवाशाने म्हटले आहे की, सरकार आम्हाला कीटक-माकडे समजत आहे. आम्ही माणूस नाही का?
हेही वाचा