रशिया-युक्रेन युद्धावरील केंद्र सरकारच्‍या भूमिकेशी विरोधक सहमत : राहुल गांधी | पुढारी

रशिया-युक्रेन युद्धावरील केंद्र सरकारच्‍या भूमिकेशी विरोधक सहमत : राहुल गांधी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशिया-युक्रेन युद्धाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्‍या भूमिकेशी विरोधी पक्ष सहमत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि. ८) स्‍पष्‍ट केले. युरोप दौर्‍यावर असणार्‍या राहुल गांधी यांनी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्‍स येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. ( Rahul Gandhi on Europe tour )

रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले तेव्हा भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची खरेदी केली. याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना राहुल गांधी म्‍हणाले की, “मला वाटते की विरोधक, रशिया आणि युक्रेनमधील संघर्षावर भारत सरकारने घेतलेल्‍या सध्याच्या भूमिकेशी सहमत असतील. आमचे रशियाशी संबंध आहेत. मला वाटत नाही की, या प्रश्‍नी विरोधी पक्षाची भूमिका सत्ताधारी केंद्र सरकारपेक्षा वेगळी असेल. ( Rahul Gandhi on Europe tour )

युक्रेनबरोबरील संघर्ष रशियाने लवकरात लवकर संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्गाने सोडविणे आवश्‍यक असल्‍याची भारताची भूमिका आहे, असेही ते म्‍हणाले.

केंद्र सरकारवर साधला निशाणा

यावेळी राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना G20 शिखर परिषदेला आमंत्रित देण्‍यात आले नसल्‍याबाबत विचारल्‍यावर त्‍यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला. ते म्‍हणाले, यामध्‍ये वेगळे काय आहे? केंद्र सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्याला निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून तुम्हाला कळाले असेल की, भारतातील केंद्र सरकार विरोधी पक्षाच्‍या नेत्‍याला महत्त्व देत नाही. आता याचा विचार लोकांनी करण्‍याची गरज आहे.

युरोप दौर्‍यावर असणारे राहुल गांधी बेल्जियमनंतर फ्रान्‍सची राजधानी पॅरिसला जाणार आहेत. येथे ते फ्रेंच खासदारांची भेट घेणार आहेत. देशात परतण्यापूर्वी त्यांचा शेवटचा दौरा नॉर्वेला असेल, जिथे ते ओस्लो येथे देशातील संसद सदस्यांना भेटतील, अशी शक्‍यता आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button