Chandrayaan-3 चं काउंटडाऊन त्यांचं अखेरचं ठरलं! 'इस्रो'च्या शास्त्रज्ञ एन वलारमथी यांचं निधन | पुढारी

Chandrayaan-3 चं काउंटडाऊन त्यांचं अखेरचं ठरलं! 'इस्रो'च्या शास्त्रज्ञ एन वलारमथी यांचं निधन

पुढारी ऑनलाईन : भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञ आणि चांद्रयान-३ च्या काउंटडाऊनला ज्यांचा आवाज लाभला त्या एन वलरमथी यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी तामिळनाडूतील चेन्नईत निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे.

चांद्रयान-३ चे (Chandrayaan-3) प्रक्षेपण १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले होते. इस्रोचे माजी संचालक डॉ. पी. व्ही. वेंकीटाकृष्णन यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे, ”श्रीहरिकोट्टा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काउंटडाऊनसाठी वलारमथी मॅडमचा आवाज आता ऐकू येणार नाही. चांद्रयान ३ चे काउंटडाऊन हे त्यांचे अखेरचे ठरले आहे. त्यांच्या जाण्याने खूप दुःख झाले!”

वृत्तानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि शनिवारी संध्याकाळी चेन्नईमध्ये त्यांचे निधन झाले. एन. वलारमथी यांचा जन्म ३१ जुलै १९५९ रोजी झाला होता. त्या १९८४ मध्ये ISRO च्या सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांनी इस्रोच्या अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या RISAT-1 च्या प्रकल्प संचालक होत्या. RISAT-1 हा भारताचा पहिला स्वदेशी विकसित रडार इमेजिंग उपग्रह (RIS) आणि देशातील दुसरा असा उपग्रह आहे.

अनेक सोशल मीडिया यूजर्संनी इस्रोच्या दिवंगत शास्त्रज्ञ वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “वलारमथी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. आम्ही गेल्या वर्षी आमच्या विक्रम-एस लाँचसाठी त्यांच्यासोबत जवळून काम केले होते. त्या लाँच काउंटडाऊनच्या आवाज होत्या,” असे एका यूजर्सन X वर लिहिले आहे.

दुसर्‍या एका यूजर्सने म्हटले आहे की, “जय हिंद….काउंटडाऊनचा आवाज म्हणून त्या आठवणीत राहतील….आम्हाला चंद्रावर शिवशक्ती पॉइंट देऊन त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”

हे ही वाचा :

Back to top button