बंंगळूर, वृत्तसेवा : चंद्रावरील सूर्यप्रकाशाचे 14 दिवस संपत आले आणि त्याआधीच 'इस्रो'च्या वैज्ञानिकांनी दिलेली सारी कामे आटोपून रोव्हर आता चंद्रावरच पार्क करून झोपी गेला आहे. त्यावरील सार्या यंत्रणा बंद करण्यात आल्या आहेत. आता 22 सप्टेंबर रोजी चंद्रावर सूर्यप्रकाश येईल तेव्हा रोव्हर जागा झाला तर ठीक; अन्यथा तो चंद्रावरच भारताचा राजदूत म्हणून कायमस्वरूपी राहील.
'इस्रो'ने शनिवारी सायंकाळी ही माहिती जाहीर केली. 23 तारखेला सूर्यप्रकाश असताना भारताचे विक्रम लँडर चंद्रावर उतरले. 24 तारखेला रोव्हरने चंद्रावर पाय ठेवला. चंद्रावर सूर्यप्रकाश 14 दिवसांचा असतो. 14 दिवसांच्या रात्रीनंतर तो पुन्हा येतो. त्यामुळे उरलेल्या सूर्यप्रकाशाच्या दिवसांत करावयाच्या कामांची यादी 'इस्रो'कडे तयार होती.
'ही' कामे रोव्हरने केली
चंद्रावर 100 मीटरपेक्षा अधिक फेरफटका मारत, 'इस्रो'च्या भाषेत सांगायचे तर लहान मुलासारखे नाचत-बागडत रोव्हरने आपली कामे हातावेगळी केली. तापमान मोजले, रासायनिक घटकांचा अभ्यास करीत सल्फर असल्याचा शोध घेतला. याच शोधावर शिक्कामोर्तब करण्यासाठी लेसरची चाचणी घेतली आणि चंद्रावरच्या भूकंपाची नोंदही घेतली. या टप्प्यातले त्याचे काम संपले आणि चंद्रावरचा दिवसही संपत आला.
सगळा डेटा पाठवला
'इस्रो'ने शनिवारी ट्विटरवर रोव्हरबाबत महत्त्वाची माहिती जारी केली. त्यात म्हटले आहे की, रोव्हरने दिलेल्या सगळ्या असाईनमेंट पूर्ण केल्या. आता तो सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यात आला आहे. 'एपीएक्सएस' आणि 'लिब्स' या त्याच्यावरच्या दोन्ही यंत्रणा बंद करण्यात आल्या आहेत. लँडरच्या माध्यमातून त्याच्याकडील सगळा डेटा पृथ्वीवर पाठवण्यात आला आहे.
आता प्रतीक्षा आणि धाकधूक
सध्या त्याची बॅटरी 100 टक्के चाजर्र् आहे. त्यावरचे सोलर पॅनेल 22 सप्टेंबर रोजी ज्या दिशेने सूर्यकिरणे येतील त्या दिशेला करून ठेवण्यात आले आहे. त्याचा रिसिव्हर सुरूच आहे. 22 सप्टेंबर रोजी पुन्हा 14 दिवसांसाठी सूर्यप्रकाश येईल तेव्हा तो जागा झाला, तर त्याला आणखी नवीन असाईमेंट दिल्या जातील; अन्यथा रोव्हर तेथेच भारताचा चंद्रावरचा राजदूत म्हणून कायमसाठी चंद्रावरच राहील, असेही 'इस्रो'ने म्हटले आहे.