पुढारी ऑनलाईन : भारताच्या चांद्रयान मोहिमेनंतरर आता सूर्य मोहिमेला देखील यशस्वीरित्या सुरूवात झाली आहे. शनिवार (दि.३ सप्टेंबर ) ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा केंद्रावरून सूर्ययान 'आदित्य एल-१' चे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. या सूर्ययानाने पृथ्वीची पहिली कक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे इस्रोने म्हटले आहे. 'आदित्य एल-१' हा उपग्रह निरोगी असून, व्यवस्थितरित्या कार्यरत असल्याची माहिती देखील इस्रोने 'X' (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे.
बेंगळुरूमधील इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कने युक्ती वापरत 'आदित्य एल-१' ची पहिल्यांदा कक्षा वाढवली. ही प्रक्रिया आज पहिल्यांदा येथील इस्रोच्या सेंटरमधून पार पडली. यामुळे 'आदित्य एल-१' हे पृथ्वीच्या २४५ x २२४५९ किमी कक्षेत फिरत आहे. पुढील प्रक्रिया ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार असल्याचे देखील इस्रोने म्हटले आहे.
सूर्य मोहिमेच्या माध्यमातून 'इस्रो' सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्याच गोष्टींचा अभ्यास करणे 'इस्रो'ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास 'आदित्य एल-1' करणार आहे. त्याखेरीज सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील, अशी अपेक्षा आहे. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. 'आदित्य एल-1'चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. 'चांद्रयान-3'प्रमाणेच 'आदित्य एल-1' सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून 'एल-1' पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्या मारताना 'आदित्य एल-1' सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल. (Aditya L1 Launch)
सूर्याचा अगदी वरच्या भागाचा त्याशिवाय क्रोमोस्पेअर, आणि कोरोना यांचा अभ्यास आदित्य एल १ करणार आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणाला कोरोना असे म्हटले जाते. तर सूर्याचा जो दृश्य भाग आहे, त्याला फोटोस्फेअर (photosphere) म्हटले जाते. फोटोस्पेअर आणि कोरोना (Corona) यांच्यामध्ये प्लाज्माचा थर आहे, याला क्रोमोस्फेअर (chromosphere) म्हटले जाते. याला प्लाज्माचे फिजिक्स, सौर-वादळे, कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे. (ISRO study in Aditya-L1 mission)
स्पेसक्राफ्टच्या प्लेलोडवर सूर्याच्या पृष्ठभागावरील पार्टिकल (कण) आणि प्लाज्मा वातावरण यांचा नैसर्गिक स्थितीत अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा कोरोना भागाचे फिजिक्स आणि हा कोरोना कशा प्रकारे तप्त होतो, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास केला जाणार आहे. (Aditya-L1 solar mission)
कोरोनोल लूपमधील प्लाज्माचा वेग, तापमान, घनता, कोरोनल मास इजेक्शनची निर्मिती कोठे होते, यांचाही सविस्तर अभ्यास होईल.
सूर्याच्या कोरोनाचे चुंबकीय क्षेत्र, अंतराळातील हवामान, सौरवादळांचे स्वरूप यांचा बारकाईने अभ्यास केला जाईल. सूर्यावरील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये कोरोनल हिटिंग, कोरोनल मास इजेक्शन, सौरवादळे, अंतराळातील हवामान यांचा समावेश होतो, यांच्यावर प्रकाश टाकण्याचे काम आदित्य एल १ करणार आहे.
थोडक्यात काय तर सूर्याबद्दलची मानवाची समज, अभ्यास विस्तृत करण्याचे काम आदित्य एल१ करेल. आदित्य एल १च्या पेलोडवर जो डेटा संकलित केला जाईल, यातून सूर्य आणि त्याचा सूर्यमालेतील ग्रहांवर होणार परिणाम यांची चांगली माहिती मिळणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाची Solar Dynamics Observatory आणि युरोपियन स्पेस एजन्सीची Solar and Heliospheric Observatory या दोन मोहिमा कार्यरत आहेत. इस्रोची आदित्य एल १ ही मोहीम यांच्या तोडीस तोड असेल.
या मोहिमेचे वैशिष्ट्यं म्हणजे सूर्याच्या बाह्यभागाचा सूक्ष्मपणे होणारा अभ्यास आणि सूर्याच्या अल्ट्राव्हॉयलेट प्रकाशात मिळवाता येणाऱ्या प्रतिमा हे ठरणार आहे. एकूणच काय तर सूर्याचा पृथ्वीवरील हवामान आणि अंतराळातील हवमान यांच्यावर कसा प्रभाव पडतो, या प्रकाश टाकण्याचे काम आदित्य एल १ करणार आहे, त्याचा मोठा फायदा पर्यावरण आणि तंत्रज्ञान अभ्यासात आणि विकासात होणार आहे.
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एकूण ५ लॅगरेंज पॉईंट आहेत. या पॉईंटवर सूर्य आणि पृथ्वी या दोन्हीतील गुरुत्वाकर्षण एखाद्या लहान वस्तूचे सेंट्रिफ्युगल फोर्स (अपकेंद्री बल) संतुलित ठेवते. त्यामुळे ही लहान वस्तू या सूर्य आणि पृथ्वीच्या अनुषंगाने स्थीर राहाते.
लॅगरेंज पॉईंट १ हा पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. सूर्याची पृथ्वीभोवतीची जी कक्षा आहे, त्यावर हा लॅगरेंज पॉईंट १ आहे. (what are earth-sun lagrange points)
सूर्याच्या अभ्यासासाठी लॅगरेंज पॉईंट १ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या पॉईंटवरील कोणतीही वस्तू सूर्य-पृथ्वीच्या अनुषंगाने स्थिर राहाते. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणातील परस्पर संबंधातून ही स्थिरता येते, त्यामुळे वेगवेगळ्या शास्त्रीय संशोधनासाठी हा पॉईंट महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी Solar and Heliospheric Observatory याच ठिकाणी आहे. येथून सूर्याच्या दर्शन सातत्याने होत राहाते, पृथ्वीवरील वातावरण, पृथ्वीवरील दिवस आणि रात्रीचे चक्र याचा यावर परिणाम होत नाही. आदित्य L1वरील सातपैकी ४ पेलोड सूर्याच्या दिशेने आहेत, तर ३ पेलोड विविध प्रयोग करतील, त्यामुळे सूर्यमालेतील सूर्याच्या विविध अंगाने शास्त्रीय माहिती मिळणार आहे.