Chandrayaan-3 Mission Updates | ‘प्रज्ञान’चं चंद्रावरचं शतक पूर्ण, ISRO ने सांगितले रोव्हर आता कुठे आहे?

Chandrayaan-3 Mission Updates | ‘प्रज्ञान’चं चंद्रावरचं शतक पूर्ण, ISRO ने सांगितले रोव्हर आता कुठे आहे?

पुढारी ऑनलाईन : भारताची सूर्यमोहीम आदित्य एल-१ चे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या दरम्यान, भारतीय अतंराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान- ३ विषयीही एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. चांद्रयान ३ च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे १०० मीटर अंतर पार केले आहे आणि त्याचे मार्गक्रमण सुरु असल्याचे इस्रोने म्हटले आहे. (Chandrayaan-3 Mission Updates)

आता प्रज्ञान रोव्हर 'शिवशक्ती पॉईंट' या लँडिंग साइट विक्रम लँडरपासून १०० मीटर अंतरावर आहे आणि तो पुढे मार्गक्रमण करत आहे. इस्रोने याचा एक नवीन फोटो ?Pragyan 100* अशी कॅप्शन देत एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. यामध्ये प्रज्ञानचे मूनवॉक स्पष्टपणे दिसत आहे.

चंद्रावर सूर्यास्त होताच प्रज्ञान आणि विक्रम त्यांचे कार्य थांबवतील. त्यांच्यावर सोलर पॅनेल बसवलेले आहेत आणि ते सूर्यप्रकाशापासून ऊर्जा निर्माण करतात. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा चंद्रावरील तापमान -२०३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते.

चांद्रयान-३ चा चंद्रावर उतरल्यानंतरच्या नवव्या दिवसाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावरून भूकंपाची नोंद घेण्यात विक्रम लँडरला यश मिळाले आहे. विक्रम लँडरवर बसवलेल्या इन्स्ट्रुमेंट ऑफ लुनार सिस्मिक अ‍ॅक्टिव्हिटी (इल्सा) या पेलोडने २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भूकंपाची नोंद घेतली. भूकंपाच्या केंद्रबिंदूचा शोध सुरू असल्याचे वक्तव्य 'इस्रो'कडून सांगण्यात आले होते.

विक्रम लँडरवर बसवलेल्या रेडिओ अ‍ॅनाटॉमी अतिसंवेदनशील लोनोस्फियर आणि अ‍ॅटमॉस्फियर-लँगमुइर प्रोब (रम्भा) या पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्लाझ्मा शोधून काढला आहे; पण तो विरळ आहे. मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर असल्याची दुसर्‍यांदा पुष्टी झाली आहे. (Chandrayaan-3)

इस्रोने (ISRO) ने याआधी सुरक्षित मार्गाच्या शोधासाठी फिरणाऱ्या चंद्रावरील प्रज्ञान रोव्हरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. हे रोटेशन लँडर इमेजर कॅमेऱ्याने टिपले होते. "असे वाटते की चंदामामाच्या अंगणात एखादे लहान मूल खेळत आहे, तर आई ते प्रेमाने पाहते आहे. आहे ना?" अशी कॅप्शन देत इस्रोने रोव्हरचा खास व्हिडिओ एक्सवर (ट्विटर) शेअर केला होता. (Chandrayaan-3 Mission)

यापूर्वी बुधवारी ३० ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणाऱ्या प्रज्ञान रोव्हरने स्माईल प्लीज! म्हणत विक्रम लँडरची छायाचित्रे टिपली होती. याबाबतची अपडेट इस्रोने (ISRO) एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली होती. रोव्हरवरील (NavCam) ऑनबोर्ड नेव्हिगेशन कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली आहेत. चांद्रयान-३ मोहिमेसाठी नवकॅम्स इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम (LEOS) च्या प्रयोगशाळेने हा कॅमेरा विकसित (Pragyan captures Vikram) केला आहे.

हे ही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news