Chandrayaan-3 Mission | चांदोमामाच्या अंगणात खेळतोय ‘प्रज्ञान’! ISRO ने शेअर केला खास व्हिडिओ | पुढारी

Chandrayaan-3 Mission | चांदोमामाच्या अंगणात खेळतोय 'प्रज्ञान'! ISRO ने शेअर केला खास व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने (ISRO) ने गुरुवारी सुरक्षित मार्गाच्या शोधासाठी फिरणाऱ्या चंद्रावरील प्रज्ञान रोव्हरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हे रोटेशन लँडर इमेजर कॅमेऱ्याने टिपले आहे. ”असे वाटते की चंदामामाच्या अंगणात एखादे लहान मूल खेळत आहे, तर आई ते प्रेमाने पाहते आहे. आहे ना?” अशी कॅप्शन देत इस्रोने रोव्हरचा खास व्हिडिओ एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. (Chandrayaan-3 Mission)

दरम्यान, चांद्रयान-३ रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर केलेल्या इन-सीटू वैज्ञानिक प्रयोगांमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील लँडिंग क्षेत्रात सल्फर (sulphur) असल्याची आणखी एक पुष्टी झाली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर असल्याची ही दोन दिवसांत दुसरी पुष्टी आहे. रोव्हरवरील आणखी एक साधनाने दुसर्‍या तंत्राद्वारे येथे गंधक असल्याची पुष्टी केल्याची माहिती इस्रोने दिली आहे. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी (APXS) ने गंधक तसेच इतर काही घटक शोधले आहेत.

दरमम्यान, भारताने पाठवलेल्या ‘चांद्रयान-३’ चे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर दिमाखात अभिमानाने उभे आहे. प्रज्ञान रोव्हरने लँडर विक्रमचे आणखी एक छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. हे छायाचित्र इस्रोने काल रात्री उशिरा शेअर केले आहे. चंद्रावर फिरत असलेल्या रोव्हरने लँडरची टिपलेली ही छबी (Pragyan captures Vikram) इस्रोने त्यांच्या अधिकृत X वरुन (पूर्वीचे ट्विटर) शेअर केली आहे.

यापूर्वी बुधवारी ३० ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणाऱ्या प्रज्ञान रोव्हरने स्माईल प्लीज! म्हणत विक्रम लँडरची छायाचित्रे टिपली होती. याबाबतची अपडेट इस्रोने (ISRO) एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली होती. रोव्हरवरील (NavCam) ऑनबोर्ड नेव्हिगेशन कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली आहेत. चांद्रयान-३ मोहिमेसाठी नवकॅम्स इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम (LEOS) च्या प्रयोगशाळेने हा कॅमेरा विकसित (Pragyan captures Vikram) केला आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरलेल्या विक्रम लँडरमधील रोव्हरचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्याच्या हातात सूर्यप्रकाशाचे अवघे १४ दिवस असल्याने त्याच्या कामाचा वेग वाढला आहे. यापूर्वी रोव्हरने तापमानाबाबत नोंदी पाठवत चंद्राच्या पृष्ठभागावर उणे १० अंश ते ६० अंश तापमान असल्याची महत्त्वाची माहिती पाठवली होती. त्याचे विश्लेषण करण्यात शास्त्रज्ञ गुंतले असताना आता नवीन माहिती समोर आली आहे. (Chandrayaan-3 Mission)

रोव्हरवर बसवलेल्या लेझरयुक्त स्पेक्ट्रोमीटरचा वापर करून चंद्रावर कोणते रासायनिक घटक आहेत याचा शोध घेतला आहे. त्यात चंद्रावर गंधक उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरणांच्या मदतीने हा अभ्यास करण्यात येत आहे. अपेक्षेनुसार चंद्रावर अ‍ॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटानियम, सिलिकॉन, मँगेनिज आणि ऑक्सिजन असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. हायड्रोजनचा शोध सुरू आहे, असे यापूर्वी इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.

 हे ही वाचा :

Back to top button