Closing Bell | बाजारात चौफेर खरेदी! सेन्सेक्स ५५५ अंकांनी वाढला, गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी श्रीमंत | पुढारी

Closing Bell | बाजारात चौफेर खरेदी! सेन्सेक्स ५५५ अंकांनी वाढला, गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी श्रीमंत

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील रिकव्हरीमुळे आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी वाढले. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीतील ७.८ टक्क्यांच्या आर्थिक वृद्धीमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना मदत झाली. यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढून ६५,४७३ वर पोहोचला. सेन्सेक्सची ही वाढ १ टक्के एवढी आहे. त्यानंतर सेन्सेक्स ५५५ अकांनी वाढून ६५,३८७ वर बंद झाला. तर निफ्टी १८१ अंकांच्या वाढीसह १९,४३५ वर स्थिरावला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात फार्मा वगळता सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.७ टक्क्यांनी वाढले. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे ३ लाख कोटींचा फायदा झाला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज शुक्रवारी (दि.१ सप्टेंबर) ३१२.३४ लाख कोटींवर पोहोचले. ३१ ऑगस्ट रोजी बाजार भांडवल ३०९.५९ लाख कोटी रुपये होते. (Closing Bell)

सेवा क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत भारताची जीडीपी वाढ ७.८ टक्के एवढी चार तिमाहीतील उच्चांकावर पोहोचली आहे. जागतिक बाजारातील रिकव्हरी, हेवीवेट स्टॉक्समधील खरेदी आदी घटक बाजारातील तेजीसाठी महत्त्वाचे ठरले.

सेन्सेक्स आज ६४,८५५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,४७३ अंकांपर्यंत वाढला. सेन्सेक्सवर आज एनटीपीसीचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ५ टक्के वाढून २३१ रुपयांवर पोहोचला. तर जेएसडब्ल्यू, मारुती, पॉवर ग्रिड, टाटा स्टील हे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढले. इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, एचसीएस टेक, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये घसरण झाली.

आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर घसरला

आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर (Shares of IDFC First Bank) शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात एनएसईवर सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ८९ रुपयांपर्यंत आला. त्यानंतर हा शेअर ९१ रुपयांवर स्थिरावला. गेल्या तीन दिवसांत हा शेअर वाढला होता. पण आज या तेजीला ब्रेक लागला. हा शेअर याआधी ९६ रुपयांपर्यंत वाढला होता. (Closing Bell)

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीची चिंता कमी झाल्यामुळे अमेरिकेतील बाजारात काल संमिश्र स्थिती दिसून आली. पण चीनमधील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे आशियाई शेअर बाजारांवर दबाव राहिला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (Foreign institutional investors) गुरुवारी २९७३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ४,३८३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले।

बाजारातील तेजीची कारण

  • भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे समोर आलेली आकडेवारी 
  • जागतिक बाजारातील रिकव्हरी
  • डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत
  • हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी

हे ही वाचा :

Back to top button