मुंबई : पुढारी वृत्तसेवा- उद्योगपती गौतम अदानी यांच्या अनेक शेल कंपन्या असून त्यांनी सेबीच्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे अदानींच्या कंपन्यांमध्ये सापडलेल्या २० हजार कोटींचा मालक कोण? असा सवाल करत संसदेची संयुक्त समिती स्थापन करून त्यामार्फत चौकशी करा, अशी जोरदार मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी केली.
देशभरातील विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडियाच्या बैठकीसाठी काँग्रेस नेते जयराम रमेश मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत येताच त्यांनी काँग्रेस मुख्यालय टिळक भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे नववे जी-२० शिखर संमेलन झाले होते.
या संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात, मनी लॉन्ड्रींग, काळा पैसा सफेद करणाऱ्यांच्याविरोधात, शेल कंपन्या विरोधात आवाज उठवत सर्वांनी एकत्र काम करायला हवे, असे आवाहन केले होते. आता पुढील आठवड्यात 18 वी जी-20 संमेलन भारतात होत आहे. तत्पूर्वीच आज सर्व वर्तमानपत्रात गौतम अदानी यांनी शेल कंपन्याचा उपयोग केला असून सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रसिद्ध झाले आहे, याकडे रमेश यांनी लक्ष वेधले.