हिंडेनबर्गनंतर ‘OCCRP’ची भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांना ‘एक्सपोज’ करण्याची योजना | पुढारी

हिंडेनबर्गनंतर 'OCCRP'ची भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांना 'एक्सपोज' करण्याची योजना

पुढारी ऑनलाइन डेस्क : हिंडेनबर्गने रिसर्चने जानेवारी महिन्यात अदानी ग्रुप समूहावर स्फोटक अहवाल सादर करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सना मोठे नुकसान झाले होते. हिंडेनबर्गनंतर आता OCCRP (ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट) ही संस्था लवकरच आणखी काही भारतीय कॉर्पोरेट घराण्यांना एक्सपोज करण्याची योजना आखत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडिया टुडेने याची माहिती दिली आहे.

OCCRP संस्था कोण आहे?

OCCRP या संस्थेचे पूर्ण नाव ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ असे आहे. या संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ही संस्था पत्रकारांचे एक जागतिक नेटवर्क आहे. ही संस्था गुन्हे आणि भ्रष्टाचार उघड करते जेणेकरून जनता याचा हिशोब ठेवू शकते. या संस्थेला अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड यांच्यामार्फत वित्तपुरवठा केला जातो, अशी माहिती आहे. या व्यतिरिक्त फोर्ड फाऊंडेशन आणि ओक फाऊंडेशन यांचा देखील यांचा देखील देणगीदारांमध्ये समावेश आहे. मात्र, सर्वात जास्त फंड ओपन सोसायटी फाउंडेशनचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याकडून करण्यात येते. OCCRP ने जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटीला परोपकारी संस्था म्हटले असून त्यांच्यामुळे आमचे कार्य शक्य होते.

जॉर्ज सोरोस (George Soros)कोण आहेत?

जॉर्ज सोरोस हे हंगेरियन अमेरिकन आहेत. ते सोरोस फंड मॅनेजमेंट आणि ओपन सोसायटी इन्स्टिस्ट्यूटचे अध्यक्ष असून काउंसिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या निर्देशक बोर्डाचे पूर्व सदस्य आहेत. जॉर्ज हे एन्ट्राप्रेन्यूअर, करंसी ट्रेडर, इनव्हेस्टर, तत्वज्ञानी आणि राजकीय कार्यकर्ते आहेत. युनायटेड स्टेट्समध्ये, 2004 मध्ये अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या पुन:निवडणुकीच्या प्रयत्नांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या मोहिमेसाठी मोठ्या रकमेची देणगी देण्यासाठी ते ओळखले जातात.

OCCRP च्या रडारवर कोणत्या भारतीय कंपन्या आहेत?

OCCRP हा समूह भारतातील काही कॉर्पोरेट घराण्यांवर अहवाल किंवा लेखांची मालिका प्रकाशित करू शकतो, असे पीटीआय अहवालात म्हटले आहे. कॉर्पोरेट हाऊसेसच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्‍या परदेशातील निधीचा ‘उघड’ समावेश असू शकतो. मात्र, या कंपन्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु एजन्सी भांडवली बाजारावर बारीक नजर ठेवून आहेत. त्यामुळे ही संस्था आता नेमकी कोण-कोणते कॉर्पोरेट हाऊस या संस्थेच्या रडारवर आहेत हे अद्याप सांगता येत नाही.

जानेवारीमध्ये आलेल्या हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांवर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप करण्यात आला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. तसेच जगातील सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून गौतम अदानी यांचे स्थान बाहेर फेकले गेले होते.

जॉर्ज सोरोस यांनी मोदींवर केली होती टीका

हिंडनबर्गने अदानी समूहावर केलेल्या आरोपानंतर मोठा वाद निर्माण झाला होता, जॉर्ज सोरोस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समूहावरील आरोपांबाबत परदेशी गुंतवणूकदार आणि संसदेच्या “प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील”. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार टीका केली होती. यावेळी भाजपने म्हटले होते की, जॉर्ज सोरोस यांनी केवळ पंतप्रधान मोदींवरच हल्ला केला नाही तर भारतीय लोकशाही व्यवस्थेलाही लक्ष्य केले आहे.

हे ही वाचा :

Back to top button