Himachal Pradesh Rainfall | हिमाचलमध्ये भूस्खलन सुरुच, कुल्लूमध्ये ८ इमारती कोसळल्या, आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा | पुढारी

Himachal Pradesh Rainfall | हिमाचलमध्ये भूस्खलन सुरुच, कुल्लूमध्ये ८ इमारती कोसळल्या, आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

पुढारी ऑनलाईन : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सातत्याने सुरूच आहे. दरम्यान, भूस्खलनाचा धोका वाढत आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कुल्लू जिल्ह्यात ८ इमारती पूर्णतः कोसळल्या आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.  येथील नागरिकांना पावसापासून दिलासा मिळणे कठीण झाले आहे. दरम्यान आज (दि.२५) पुन्हा हिमाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, या ठिकाणी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना घडत आहेत, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लोकांना दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्याचवेळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात आज (दि.२५) पुन्हा अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Himachal Pradesh Rainfall : आज जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलन, शिमला, सिरमौर, मंडी, कुल्लू, उना, बिलासपूर आणि कांगडा जिल्ह्यांच्या काही भागात आज यलो अलर्ट असून अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या २४ तासात कुठे किती पाऊस?

गेल्या २४ तासांत हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. जोगिंदर नगरमध्ये १५४ मिमी, पालमपूरमध्ये १३६ मिमी आणि सिरमौरमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिमला शहरात गेल्या २४ तासात ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर; मोठ्या प्रमाणात विध्वंस

हिमालयीन राज्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटींमुळे मोठ्या प्रमाणावर विनाश आणि मृत्यू झाल्याची नोंद राज्याच्या विविध भागांतून नोंदवण्यात आली आहे. २४ ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने ८ मोठ्या इमारती कोसळल्या तर दोन इमारतींचे अंशत: नुकसान झाले आहे. वेळीच इमारती रिकाम्या करण्यात आल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुासार, आत्तापर्यंत हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. तर ९९२४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. राज्यातील २,२३७ नळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच 300 दुकाने आणि ४७८३ गोठ्यांचे नुकसान झाले आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button