Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन; कुल्लूमध्ये अनेक इमारती कोसळल्या (Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस पावसाने हिमाचल प्रदेशमध्ये थैमान घातले आहे. राज्यातील कुल्लू जिल्ह्यातील अन्नी शहरात आज (दि.२४) मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत कोणलाही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. इमारती कोसळल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. प्रशासनाने आठवडाभरापूर्वी नोटीस बजावून येथील लोकांना इमारती खाली करण्याचे आवाहन केले होते. ( Himachal Pradesh)
माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन झाल्याने कुल्लू जिल्ह्यात अनेक इमारती कोसळल्या आहेत. परिणामी कुल्लू जिल्ह्यात १० किलोमीटर लांब वाहतूक कोंडीमुळे शेकडो वाहने अडकून पडली आहेत. पावसामुळे मंडीला जोडणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाले आहे. बुधवारी (दि.२३) हिमाचल प्रदेशातील अधिकाऱ्यांनी १२ नवीन मृत्यूची नोंद केली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे असंख्य घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
Himachal Pradesh : या भागात रेड अलर्ट
सततच्या मुसळधार पावसामुळे कांगडा, कुल्लू, मंडी आणि शिमला भागात रेड अलर्ट जारी केला आहे. शिमला, सिरमौर, कांगडा, चंबा, मंडी, हमीरपूर, सोलन, बिलासपूर आणि कुल्लू या जिल्ह्यांसाठी पूर येण्याचाही अंदाज वर्तवला आहे. या पावसाळ्यात हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आणि भूस्खलन झाले आहे. या महिन्यात, पावसाशी संबंधित घटनांमुळे ८० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि एकूण २४२ मृत्यू झाले आहेत.
सिमल्यात प्रचंड नुकसान
सिमल्यात मुसळधार पावसामुळे देवदारची मोठी झाडे उन्मळून पडली, भूस्खलन आणि पडलेल्या झाडांच्या खाली घरे आणि वाहनांचे नुकसान झाले. शहरातील रस्ते सकाळपासून रोखण्यात आले होते. सिमल्यात वीज आणि पाणी पुरवठ्यासह मूलभूत सुविधा विस्कळीत झाल्या. झारखंडमधील एका जोडप्याचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला आहे. चंदीगड ते सिमला आणि मनाली हे दोन महत्त्वाचे पर्यटन महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा
- Nepal Accident update | नेपाळमधील अपघातात ६ भारतीय भाविकांसह ७ जणांचा मृत्यू
- ना नंबर, ना लायसन्स, कॅनॉटमध्ये सायरन वाजवित बेदरकार ड्रायव्हिंग; सिडको पोलिसांनी जप्त केले वाहन
- Chandrayaan-3 : 'भारत आता चंद्रावर आहे…' इस्रोच्या प्रमुखांची चांद्रयान-३ यशानंतर पहिली प्रतिक्रिया
- Sharad Pawar On Hasan Mushrif : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार कोल्हापुरात; हसन मुश्रीफांबद्दल काय बोलणार ?

