पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे 'लुना-२५' हे अंतराळयान प्री-लँडिंग कक्षेत कोसळले होते. आता भारतीयांसह जगाच्या नजरा चांद्रयान-३ च्या लँडिंगकडे (Chandrayaan-3 mission) लागल्या आहेत. भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेबद्दल रशियाकडून प्रतिक्रिया आली आहे. रशियन कॉन्सुल जनरल ओलेग निकोलायेविच अवदीव यांनी म्हटले आहे की, "आज चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. भारतातील प्रत्येकजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकाच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि मीदेखील चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या यशस्वी लँडिंगची वाट पाहत आहे…"
गेल्या ४० दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे 'चांद्रयान' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. (chandrayaan 3 landing time) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.
रशियाचे लुना हे चांद्रयान दोनच दिवसांपूर्वी कोसळल्याने भारताच्या मोहिमेवर आता सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. इस्रोसोबतच नासा आणि युरोपियन अंतराळ संस्था या मोहिमेवर लक्ष ठेवून असून त्यांचे एकमेकांना सहकार्य सुरु आहे.
भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या इराद्याने भारतापाठोपाठ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोहिमेसाठी निघालेल्या रशियाच्या या यानात तांत्रिक बिघाड झाला होता. आधी 'लुना-२५' चे कक्षांतर हुकल्याचे रॉसकॉसमॉस या रशियन अंतराळ संस्थेकडून सांगण्यात आले होते. 'लुना-२५' ला चंद्रावर उतरण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या चंद्राच्या कक्षेत पाठवताना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. कक्षा बदलताना अचानक बिघाड झाल्याने कक्षांतर अपेक्षित पद्धतीने होऊ शकले नाही, असेही या अंतराळ संस्थेने स्पष्ट केले होते.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आजवर केवळ रशिया, चीन आणि अमेरिका या तीनच देशांना यश आलेले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर कोणत्याही देशाने सॉफ्ट लँडिंगचे धाडस केलेले नाही. भारताचे 'चांद्रयान-३' चंद्राच्या दक्षिण ध्रुवासाठी आधी निघाल्याने मोहीम फत्ते झाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल, हे निश्चित होते.
चांद्रयानाचे लँडिंग पाहता येणार आहे. इस्रो बुधवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी आपल्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे यू ट्यूब चॅनल, इन्स्टाग्राम, एक्स खाते आणि फेसबुक पेजवरून ते सर्वांना पाहता येणार आहे. इस्रोच्या वेबसाईटवरही क्षणाक्षणाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेण्यासोबतच तेथील भूगर्भातील हालचाली, खनिजांचा शोध आदी कामे विक्रम लँडरवरील रोव्हर करणार आहे. मानवाला हवी असलेली आणि ठाऊक नसलेलीही अशी खनिजे चंद्रावर मिळू शकतात, असा अभ्यासकांचा होरा आहे. तसेच ग्राऊंड झिरोवरून चंद्राची छायाचित्रे टिपली जाणार असून, त्यातून तेथील भौगोलिक रचनेबाबत माहिती हाती येणार आहे.
हे ही वाचा :