जिच्यावर अंत्यसंस्कार केले, त्याच मुलीचा फोन आला..!

पाटणा : एखादी घटना अतर्क्य असू शकते. म्हणजे असे काही घडेल याची कल्पनाही करता येत नाही. असाच प्रकार बिहारमध्ये घडल्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. तेथे एका मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही काळातच त्या मुलीचा वडिलांना फोन आला की, बाबा मी जिवंत आहे. यानंतर वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला.
अंशू कुमारी असे या मुलीचे नाव असून काही दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सर्वतोपरी शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. नंतर चेहर्याचा चेंदामेंदा झालेल्या स्थितीतील एका मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. तो अंशूच्या कुटुंबीयांना दाखवण्यात आला. त्यांनी अंगावरील कपड्यांवरून ती अंशूच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान, खुद्द अंशूने वडील विनोद मोंडल यांना फोन करून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. याचे कारण म्हणजे आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी ती घरच्यांचा डोळा चुकवून अन्य नातेवाईकांकडे गेली होती. अंशू सुरक्षित असल्याने तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला असला तरी जिच्यावर अंत्यसंस्कार केले ती कोण, असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.
हेही वाचा :