जुगाराचा नाद जडला अन् नोकराने घरावर डल्ला मारला | पुढारी

जुगाराचा नाद जडला अन् नोकराने घरावर डल्ला मारला

पुणे : मालकाच्या बंगल्यात चोरी केल्यानंतर पोलिस आपल्याला पकडू नयेत म्हणून तो खबरदारी घेत होता. नियमित कामावरदेखील येत होता. मात्र, तो पैसे उडवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् त्याचे बिंग फुटले. त्याने ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्यासाठी ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. मालकाच्या बंगल्यात चोरी करून अकरा लाखांची रोकड, 55 तोळे सोन्याचे दागिने असा तब्बल 38 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरी करणार्‍या नोकराला अखेर चतुःशृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मनीष जीवनलाल रॉय (वय 29, रा. सिंधुनिवास बंगला, सांगवी रोड; मूळ मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेला 27 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासांच्या आत पोलिसांनी घरफोडीचा छडा लावला. सांगवी रोड औंध येथे वास्तव्यास असलेले उद्योजक त्र्यंबकराव पाटील (वय 75) यांच्या घरात चोरी झाली होती. त्यांची पत्नी मूळ गावी धुळे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या, घरातील कपाटात पाहिले असता अकरा लाखांची रोकड आणि 55 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या नोकराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांठरे, अंकुश चिंतामण, जगन्नाथ जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रूपेश चाळके, कर्मचारी बाबूलाल तांदळे, श्रीकांत वाघोले, ज्ञानेश्वर मुळे, मारुती केंद्रे, किशोर दुशिंग, तेजेस चोपडे, बाबा दांगडे, सुधीर माने, सुधीर अहिवळे यांच्या पथकाने केली.

असा लागला छडा…

चोरट्याने घरात चोरी करताना कोणत्याही प्रकारची तोडफोड केली नव्हती. त्यामुळे चोरी करणारा कोणीतरी येथीलच असणार, याची खात्री पोलिसांना पटली होती. पोलिसांनी घरातील व्यक्तींची माहिती घेतली असता नोकर मनीष राय हा त्यांच्याकडेच आऊट हाऊसला राहत होता, असे समजले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केली नसल्याचे सांगितले. तसेच, चोरी केल्यापासून तो रोजच कामावर येत होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला तेव्हा ऑनलाइन मोठी रक्कम पाठविल्याचे समोर आले. पोलिसांनी पाहिले तेव्हा त्याने ते पैसे ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्यासाठी लावल्याचे दिसून आले. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याचे कबूल केले. त्याने चोरीचा ऐवज स्टोअर हाऊसमध्येच दडवून ठेवला होता.

हे टाळायला हवे…

घरातील नोकराला मालक अनेकदा सर्व माहिती देऊन टाकतात. एवढेच नाही, तर घरातील किमती ऐवज ठेवलेल्या चाव्या कोठे असतात, हेसुद्धा माहिती असते. त्यातूनच राय या नोकराने असा डल्ला मारला आहे. त्याला घरमालक पाटील हे तिजोरीच्या चाव्या कोठे ठेवतात, हे माहिती होते. त्याने चाव्या चोरून चोरी केली. त्यानंतर त्या चाव्या आहे त्याच ठिकाणी ठेवल्या. त्यामुळे सुरुवातीला चोरी झाल्याचे त्यांना समजले नाही. यामुळे हे टाळणे गरजेचे आहे.

नागरिकांनी घरात नोकर ठेवताना त्याची पूर्ण माहिती घेऊन खात्री करावी. पोलिसांकडून त्याची चरित्रपडताळणी करून घ्यावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरातील सर्व माहिती त्याला देऊ नये. किंमती ऐवज आणि चाव्या शक्यतो त्याच्या
नजरेस पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

– बालाजी पांढरे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
चतुःश्रृंगी पोलिस ठाणे.

हेही वाचा

Weather Update : राज्याच्या काही भागात मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला

तलाठी परीक्षेत गोंधळ

महागाई नियंत्रणाची केंद्राची कसरत आणखी कठीण!

Back to top button