नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कांद्याच्या राखीव साठ्यात यावर्षी ३ लाख मेट्रिक टनावरून ५ लाख मेट्रिक टनापर्यंत वाढ झाली आहे. याअनुषंगाने ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी एनसीसीएफ (NCCF) अर्थात राष्ट्रीय भारतीय सहकारी ग्राहक महासंघाने (National Cooperative Consumers' Federation Of India) आजपासून (दि.२१) २५ रुपये किलो (Onion Price) या किरकोळ दराने कांद्याची विक्री सुरू केली आहे.
कांद्याचे ३ लाख मेट्रिक टन प्राथमिक खरेदीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव साठ्याचे प्रमाण ५ लाख मेट्रिक टन केले. अतिरिक्त खरेदीचे लक्ष साध्य करीत ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ आणि नाफेडला प्रत्येकी १ लाख टन खरेदी करण्याचे निर्देश दिले असून प्रमुख खरेदी केंद्रांमध्ये खरेदी केलेल्या साठ्याचा निपटारा करण्यात येईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (Onion Price)
ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या किरकोळ किंमती देश पातळीवरच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत किंवा मागील महिन्याच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहेत. अशा बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून राखीव साठ्यामधून कांद्याची विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. राखीव साठ्यामधून सुमारे १,४०० मेट्रिक टन कांदा बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला असून सातत्याने पुरवठा केला जात आहे.
हेही वाचा