Monsoon Update : पाऊस दीर्घकाळ न पडणे ‘दुष्काळाचे संकेत’, गेल्या ११ दिवसांपासून पाऊस नाही | पुढारी

Monsoon Update : पाऊस दीर्घकाळ न पडणे 'दुष्काळाचे संकेत', गेल्या ११ दिवसांपासून पाऊस नाही

पुढारी ऑनलाईन डेस्क :  जुलै महिन्यात मान्सूनचा उत्तम पाऊस झाला. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने ओढ दिल्याचे जाणवत आहे. मान्सूनचा पाऊस सलग गेल्या ११ दिवसांपासून पडलेला नाही, हे दुष्काळाचे येण्याचे संकेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचे ट्रफ उत्तरेकडे सरकल्यावर मान्सूनचा ब्रेक होतो. ही स्थिती हिमालयाच्या पायथ्याशी आणि पूर्व भारताच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढवते, तर देशाच्या इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमकुवत करते. (Monsoon Update) यापूर्वी पावसाने १९७२ मध्ये सलग १७ दिवस अशा प्रकारे खंडित झाला होता. त्यामुळे मान्सून हा विक्रम मोडणार का? अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्याचा मान्सूनचा हंगाम गेल्या ११ दिवसांपासून खंडित आहे. ही स्थिती दुष्काळाची परिसस्थिती दर्शवत आहे. “अकरा दिवस पाऊस न पडणे हे चांगले लक्षण नाही,” असे भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी डाउन टू अर्थ या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. एल निनोचा प्रभाव सध्याच्या पर्जन्यस्थितीवर स्पष्टपणे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.

१९७२ मध्ये सलग १७ दिवस पाऊस पडला नव्हता

सध्याची पावसाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. सलग काही दिवस पाऊस न पडणं हे १९५१ नंतरच्या सर्वात प्रदीर्घ स्तब्धतेकडे बोट दाखवत आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, गेल्या ७३ वर्षात अशी परिस्थिती एकूण १० वेळा  निर्माण झाली आहे की 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस पडलेला नाही. १९७२ मध्ये सलग १७ दिवस पाऊस पडला नाही. १९६६ आणि २००२ मध्ये १० दिवसांसाठी पाऊस पडलेला नव्हता. तज्ज्ञांच्या मते, मान्सून उपखंडातून माघार घेण्यास अद्याप दीड महिना बाकी आहे, परंतु या मान्सूनमध्ये देशातील पावसाचे प्रमाण आणि खरीप उत्पादन कसे राहील हे पाहणे गरजेचे आहे.

Monsoon Update :  २६८ जिल्ह्यांमध्ये अपुरा ते अत्यल्प पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या वर्गीकरणानुसार या हंगामात मान्सून ‘सामान्य’ आहे. परंतु दीर्घकालीन सरासरीपेक्षा सहा टक्के कमी आहे. पण त्याचे वितरण विषम  झाले आहे हेही उल्लेखनीय आहे. एकूण ७१७ पैकी २६८ जिल्ह्यांमध्ये अपुरा ते अत्यल्प असा पाऊस झाला आहे. पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसात बरीच तफावत दिसून आली आहे. या पावसाने उत्तराखंड आणि हिमाचल सारख्या डोंगराळ राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे, तर पश्चिम राजस्थान आणि सौराष्ट्र-कच्छ प्रदेशातही पाऊस पडला आहे. तर केरळ, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड यांसारखे ओले क्षेत्र अल्प पावसामुळे कोरडे राहिले आहे.

हेही वाचा

Back to top button