

श्रीनगर, पुढारी वृत्तसेवा : जम्मू आणि काश्मीरमध्ये 80 च्या दशकातील चित्रपट युग पुन्हा नव्याने उदयास येत आहे. गेल्या दोन वर्षात येथे 300 हून अधिक चित्रपटांचे चित्रिकरण झाले असून प्रशासनाच्या या नवीन धोरणाचे हे यश आहे, यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटनाचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागला आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी केले. टीव्ही मालिका 'पश्मिना'च्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सिन्हा पुढे म्हणाले, 'दोन वर्षांपूर्वी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर नवीन चित्रपट धोरण सुरू केले. त्याला यश मिळत असून बघता बघता जम्मू आणि काश्मीर हे चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी पुन्हा एकदा आवडते स्थळ म्हणून उदयास येत आहे. चित्रपटाशी संबंधित उपक्रमांमुळे येथील तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पर्यटनाचे पुनरुज्जीवन होऊन येथील अर्थव्यवस्थेला चालन मिळेल. तरुणांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, '80 च्या दशकापर्यंत हॉलीवूड किंवा बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग येथे होत असे. तो काळ परत येत आहे असे मला वाटते. येथे 300 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. 'सब टीव्ही'ने त्यांच्या अगामी 'पश्मिना' या मालिकेचे शूटिंग येथून सुरू केले आहे. मी त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देतो.'