Chandrayaan 3 Update | चंद्र आता दृष्टीक्षेपात! चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलचे पहिले डीबूस्टिंग ऑपरेशन यशस्वी

Chandrayaan 3 Update | चंद्र आता दृष्टीक्षेपात! चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलचे पहिले डीबूस्टिंग ऑपरेशन यशस्वी

पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-३ ने आज शुक्रवारी चंद्राच्या अगदी जवळ जाण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. चांद्रयान-३ चे विक्रम लँडर एक दिवस अगोदर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाल्यानंतर शुक्रवारी त्याला डिबूस्ट करण्यात आले. "लँडर मॉड्यूल (LM) सुस्थितीत आहे. लँडर मॉड्यूल (LM) ने यशस्वीरित्या डीबूस्टिंग ऑपरेशन केले ज्यामुळे त्याची कक्षा ११३ किमी x १५७ किमी पर्यंत कमी झाली आहे. दुसरे डीबूस्टिंग ऑपरेशन २० ऑगस्ट २०२३ रोजी सुमारे २ वाजता होईल," अशी माहिती 'इस्रो'ने दिली आहे.

डीबूस्टिंग ही लँडरला एका कक्षेत संथगतीने ठेवण्याची प्रक्रिया आहे जिथे चंद्राच्या कक्षेचा सर्वात जवळचा बिंदू (पेरील्युन) ३० किमी आहे आणि सर्वात दूरचा बिंदू (अपोल्यून) १०० किमी आहे. डी-बूस्ट मॅन्युव्हर्स प्रक्रियेने विक्रम लँडरला एका कक्षेत ठेवले आहे. या कक्षेतून अंतिम लँडिंगचा प्रयत्न केला जाणार आहे. ३० किमी x १०० किमी परिभ्रमण पूर्ण झाले की, लँडिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग ३० किमी उंचीवरून अंतिम लँडिंगपर्यंत कमी करण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी याआधी सांगितले होते.

चांद्रयान-३ मोहिमेतील लँडरचे नाव विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते.

चांद्रयान-३ ने काल गुरुवारी महत्त्वपूर्ण टप्पा पार केला होता. प्रॉपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरपासून वेगळे झाले होते. प्रॉपल्शन मॉड्यूल तीन ते सहा महिने चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करणार आहे. लँडर-रोव्हर येत्या २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तिथे ते १४ दिवस पाण्याचा शोध घेईल व इतरही प्रयोग करेल.

चंद्राच्या कक्षेत किमान १५३ कि. मी. आणि कमाल १६३ किमी अशा वर्तुळाकार कक्षेत असताना प्रॉपल्शन मॉड्यूलपासून लँडर-रोव्हर वेगळे झाले होते. प्रक्षेपणानंतर २२ दिवसांच्या प्रवासाअंती चांद्रयान ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.१५ च्या सुमारास चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. चांद्रयान पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत दाखल झाले तेव्हा त्याची कक्षा १६४ किमी x १८,०७४ किमी होती. यानंतर एकूण ४ वेळा चांद्रयानाने आपली कक्षा रुंदावत नेली.

लँडिंगसाठी चांद्रकक्षेतून एकदम ९० अंशाच्या कोनात वळेल लँडर-रोव्हर

प्रॉपल्शन मॉड्यूलपासून विभक्त झाल्यानंतर लँडरला डिबूस्ट केले गेले. म्हणजेच त्याचा वेग कमी केला गेला. चंद्राचे किमान अंतर ३० किमी असेल, तेव्हाच २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग केले जाईल. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असताना एकाक्षणी लँडर-रोव्हरला चंद्राच्या दिशेने ९० अंशात वळावे लागेल. नंतर चंद्राच्या पृष्ठभागाकडे ते उतरू लागतील. या प्रक्रियेत सुरुवातीला त्यांचा वेग जवळपास सेकंदाला १.६८ किमी असेल. थ्रस्टरच्या मदतीने तो कमी करत नेत चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर-रोव्हर सुरक्षितरीत्या उतरविले जाणार आहे.

चंद्रावर आतापर्यंत विविध देशांनी ११० मोहिमा केल्या. यापैकी ४२ अयशस्वी झाल्या. यान चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरण्याचे ३८ वेळा प्रयत्न केले गेले. अमेरिका, रशिया, इस्रायल या देशांनी चांद्रमोहिमा आखल्या होत्या. भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेस यश मिळाले तर या तीन देशांपाठोपाठ भारत चंद्रावर आपला ठसा उमटवेल. (Chandrayaan 3 Update)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news