Gold- silver price today | सोने-चांदी दरात घसरण, जाणून घ्या किती रुपयांनी स्वस्त? | पुढारी

Gold- silver price today | सोने-चांदी दरात घसरण, जाणून घ्या किती रुपयांनी स्वस्त?

पुढारी ऑनलाईन : भारतीय सराफा बाजारात आज १६ ऑगस्ट रोजी सोने-चांदी दरात घसरण (Gold- silver price today) झाली. शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९ हजारांच्या खाली आला. तर चांदी प्रति किलो ७० हजार रुपयांवर आली आहे. गेल्या सोमवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,९६९ रुपयांवर होता. त्यात आज घट होऊन तो ५८,८४३ रुपयांवर आला. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दरात हळूहळू घट होताना दिसत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,८४३ रुपये, २३ कॅरेट ५८,६०७ रुपये, २२ कॅरेट ५३,९०० रुपये, १८ कॅरेट ४४,१३२ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३४,४२३ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७०,१६० रुपयांवर खुला झाला आहे. गेल्या सोमवारी चांदीचा दर प्रति किलो ७०,२११ रुपये होता.

११ जुलैनंतर पहिल्यांदाच सोने ५९ हजारांच्या खाली

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर ५ महिन्यांच्या निच्चांकावर गेला आहे. COMEX सोन्याचा भाव प्रति औंस १,९०२ डॉलरपर्यंत खाली आला आहे. दरम्यान, एमसीएक्सवर सोन्याचा दर ५९ हजारांच्या खाली आला आहे. ११ जुलैनंतर पहिल्यांदाच सोन्याचा दर ५९ हजारांच्या खाली आला आहे. MCX वर चांदीचा दर ७० हजारांच्या खाली आला आहे. (Gold- silver price today)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button