‘हिमाचल’वरील संकटाचे ‘ढग’ हटेनात! पुन्‍हा पावसाचा ‘रेड अलर्ट’, बळींची संख्या ५५ वर

सिमल्याच्या समरहिल भागात साेमवारी मंदिरावर झालेल्या भूस्खल झाले हाेते. मंगळवारीही शाेधकार्य सुरु ठेवण्‍यात आले. या दुघर्टनेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. 
सिमल्याच्या समरहिल भागात साेमवारी मंदिरावर झालेल्या भूस्खल झाले हाेते. मंगळवारीही शाेधकार्य सुरु ठेवण्‍यात आले. या दुघर्टनेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गेल्‍या दोन दिवसांपासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्‍याने मुसळधार पावसामुळे हाहाकार माजाला आहे. हिमाचलमध्‍ये बळींची संख्‍या ५५ वर गेली आहे. अनेक ठिकाणी झालेल्‍या भूस्खलनामुळे होऊन मुख्य रस्ते बंद झाले आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्‍यान, भारतीय हवामान विभाग (IMD) ने मंगळवारी रात्रीपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला असून, राज्‍यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्‍यक्‍त केली आहे. ( Himachal Pradesh  Heavy rainfall )

मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती

नैसर्गिक आपत्तीमुळे आज स्वातंत्र्यदिन एक साधा सोहळा आयोजित करण्यात आला. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम झाला नाही. या वेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, सोमवारी ( दि.१४. राज्यात भूस्खलन आणि संततधार पावसामुळे पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत सुमारे ५५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विविध दुर्घटनांमध्‍ये अनेक जण मातीच्‍या ढिगाऱ्याखाली गडले गेल्‍याची भितीमुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही त्‍यांनी सांगितले. रस्‍ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यावर आमचा भर आहे. चंदीगड-शिमला 4-लेन महामार्गासह इतर धमनी रस्ते खुले झाले. मुख्य रस्ते खुले झाले आहेत, राज्य रस्ते कार्यान्वित होण्यास वेळ लागेल, असेही मुख्‍यमंत्री सुखू यांनी स्‍पष्‍ट केले.

हिमाचल विद्यापीठातील शैक्षणिक कामकाज १९ ऑगस्टपर्यंत स्थगित

मी काल अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मी जेपी नड्डा, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशीही बोललो. हवामानाची परिस्थिती पाहून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी लष्कराचे एक हेलिकॉप्टर शिमल्यात तैनात आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, संततधार पावसामुळे हिमाचल विद्यापीठातील शैक्षणिक कामकाज १९ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे ग्रंथालयही २० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

सिमल्‍यातील भुस्‍खलन घटनेतील मृतांचा आकडा १५ वर

सिमल्याच्या समरहिल भागातील शिवमंदिरावर झालेल्या भूस्खलन घटनेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली मंगळवारी आणखी एक मृतदेह सापडला. यामुळे समरहिल आणि फागली येथील भूस्खलनाच्या घटनेतील मृतांची संख्या १५ झाली आहे, तर १० हून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि सैन्यासह पोलिस तसेच राज्य आपत्ती निवारण दल (SDRF) यांनी सकाळी ६ च्या सुमारास समरहिल येथे पुन्हा बचाव कार्य सुरू केले आणि एक मृतदेह बाहेर काढला, असे शिमलाचे उपायुक्त आदित्य नेगी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Himachal Pradesh  Heavy rainfall : उत्तराखंडमध्‍येही मुसळधार पाउस

उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील नाईट लाइफ पॅराडाईज कॅम्पमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला असून इतर चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) नुसार, "काल एका स्थानिक कॉलरने पौडी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले की जोगियाना, मोहनचट्टी गावात मुसळधार पावसामुळे नाईट लाइफ पॅराडाईज कॅम्पला भूस्खलन झाला. शिबिरातून किंकाळ्या ऐकू येत होत्या जिथे लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे."

ऋषिकेशमध्ये १४ ऑगस्‍ट रोजी देशभरात सर्वाधिक पावसाची नोंद

आयएमडीने आज सांगितले की, डेहराडून, पौरी, टिहरी, नैनिताल, चंपावत आणि उधम सिंग नगरच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये १४ ऑगस्‍ट रोजी देशभरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, १० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. शेजारच्या उत्तराखंड राज्यात शुक्रवारपासून आणखी १३ जणांचा मृत्यू झाल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्‍थगित

पूजनीय बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्री मंदिराकडे जाणारे रस्ते भूस्खलनामुळे खराब झाले आहेत. त्यामुळे चारधाम यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानांची यात्रा दोन दिवस थांबवावी लागली. कालका-शिमला, किरतपूर-मनाली आणि पठाणकोट-मंडी, धर्मशाला-शिमला या मार्गांसह प्रमुख महामार्ग सोमवारी रोखण्यात आले. उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये पुन्‍हा ताज्या भेगा पडल्या, ज्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, जोशीमठच्या सुनील गावातील १६ कुटुंबांना धोका आहे, त्यामुळे या भागात मोठी भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news