Jharkhand News: झारखंड: चाईबासा येथे पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; उपनिरीक्षक, हवालदार शहीद | पुढारी

Jharkhand News: झारखंड: चाईबासा येथे पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; उपनिरीक्षक, हवालदार शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत असताना झारखंडमधून स्वातंत्र्यदिनी एक वाईट बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा चाईबासा येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत उपनिरीक्षक आणि हवालदार शहीद झाले आहेत. या चकमकीत उपनिरीक्षक अमित तिवारी आणि हवालदार गौतम कुमार शहीद झाले आहेत. शहीद अमित तिवारी हे २०१२ च्या बॅचचे उपनिरीक्षक होते. ते पलामूचे रहिवासी होते. (Jharkhand News)

चाईबासा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड जग्वारचे एक पथक नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवून परतत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी पथकावर हल्ला करून गोळीबार केला. या गोळीबारात इन्स्पेक्टर अमित तिवारी आणि गौतम कुमार यांना गोळी लागली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. (Jharkhand News)

पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्याने नक्षलवाद्यांनी जंगलात पलायन केले.नक्षलवाद्यांच्या हातून शहीद झालेले इन्स्पेक्टर अमित तिवारी हे पलामूचे रहिवासी होते. त्यांच्या मुलाचा जन्म ३ दिवसांपूर्वी झाला होता. त्यामुळे अमित तिवारी लवकरच घरी परतणार होते. मात्र, नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ते शहीद झाले. अमित तिवारी यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य पोलीस खात्यातच कार्यरत आहेत. त्याचवेळी शहीद झालेले हवालदार गौतम कुमार यांनाही वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपातत्वावर नोकरी मिळाल्याची माहिती आहे.

झारखंडमधील चाईबासा येथे नक्षलवाद्यांचा तांडव सुरूच आहे. यापूर्वी 11 ऑगस्ट 2023 रोजी चाईबासा येथील टोंटो पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक झाली होती. घनदाट जंगलात एक कोटीचे बक्षीस असलेला नक्षलवादी मिसर बेसराचा बंकर सुरक्षा दलांनी शोधून काढला. एसपी आशुतोष शेखर यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दल बंकरमध्ये असलेले सामान परत आणणार होते. त्यामुळे माओवाद्यांनी घात घालून गोळीबार सुरू केला. ज्यात सीआरपीएफचे कॉन्स्टेबल सुशांत कुमार खुंटिया शहीद झाले होते.

हेही वाचा 

Back to top button