Closing Bell | शेअर बाजारात तेजी, मंदीचा खेळ! निच्चांकावरून सेन्सेक्स ५८० अंकांनी सावरला, ‘या’ शेअर्सनी दिला सपोर्ट | पुढारी

Closing Bell | शेअर बाजारात तेजी, मंदीचा खेळ! निच्चांकावरून सेन्सेक्स ५८० अंकांनी सावरला, 'या' शेअर्सनी दिला सपोर्ट

पुढारी ऑनलाईन : आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सोमवारी शेअर बाजारात तेजी-मंदीचा खेळ दिसून आला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) दिवसाच्या निच्चांकावरुन सुमारे ५80 अंकांनी सावरला. सुरुवातीला ४५० अंकांनी घसरलेला सेन्सेक्स बंद होताना सपाट झाला. सेन्सेक्स आज ७९ टक्क्यांच्या वाढीसह ६५,४०१ वर बंद झाला. तर निफ्टी ६ अंकांनी किरकोळ वाढून १९,४३४ वर स्थिरावला.

क्षेत्रीय पातळीवर आयटी आणि FMCG वगळता इतर सर्व निर्देशांक घसरले. मेटल निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी, तर पॉवर, रियल्टी आणि पीएसयू बँक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. बाजार सावरण्यास रिलायन्स, इन्फोसिस, टीसीएस या शेअर्सचा सपोर्ट मिळाला.
(Stock Market Closing Bell)

जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ४५० अंकांनी घसरून ६४,८७७ पर्यंत खाली आला होता. तर निफ्टी (Nifty) १२८ अंकांनी घसरून १९,२९९ वर खुला झाला होता. इन्फोसिस वगळता इतर सर्व शेअर्स लाल चिन्हात गेले होते. (Stock Market Updates) पण त्यानंतर दोन्ही निर्देशाकांनी तोटा मागे टाकत तेजीत व्यवहार केला. निफ्टी मीडिया आज १ टक्क्याने वाढला.

हेवीवेट स्टॉक्सने बाजाराला मिळाला सपोर्ट

सेन्सेक्स आज ६५,१५३ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ६४,८२१ पर्यंत खाली आला. तर बाजार बंद होताना त्याने ६५,५०० वर पर्यंत वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर १.७३ टक्के वाढून २,५७६ वर पोहोचला. तर इन्फोसिसचा शेअर १.४३ टक्के वाढून १,३९१ रुपयांवर, हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर १.४५ टक्के वाढून २,५३८ रुपयांवर गेला. आयसीआयसीआय, एशियन पेंट्स, एलटी, विप्रो हे शेअर्स वधारले. तर जेएसडब्ल्यू, एसबीआय हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांहून अधिक घसरले. टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स हे शेअर्सही घसरले.

नायकाला फटका

ऑनलाइन सौंदर्य आणि फॅशन रिटेलर नायका (Nykaa) ऑपरेट करणाऱ्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सचे शेअर्स सोमवारी एनएसईवर सुमारे ११ टक्के घसरून १३ रुपयांवर आले. या शेअर्सची ही निचांकी पातळी आहे. Nykaa ने पहिल्या तिमाहीत नफ्यात वार्षिक ८ टक्के वाढ नोंदवली आहे. त्यांचा नफा ५.४ कोटी रुपये झाला आहे. पहिल्या तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल २४ टक्के वाढून १,४२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत महसुलाचा आकडा १,१४८ कोटी रुपये होता. (Closing Bell)

अदानींच्या शेअर्समध्ये घसरण, ‘हे’ ठरले कारण

अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी विल्मर आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अदानी समूहातील इतर शेअर्स आजच्या व्यवहारात ३ टक्क्यांपर्यंत घसरले. अदानी विरुद्ध हिंडेनबर्ग प्रकरणात तपास पूर्ण करण्यासाठी आणि चौकशीचा स्थिती अहवाल सादर करण्यासाठी सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) सर्वोच्च न्यायालयात आणखी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. या पार्श्वभूमीवर अदानी समुहातील शेअर्स घसरले. अदानी एंटरप्रायजेसचा (Adani Enterprises) शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरून २,४६३ रुपयांवर आला. अदानी पोर्ट्सचा शेअर १.९६ टक्क्यांनी खाली आला.

तसेच ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अदानी पोर्ट्सचे ऑडिटर डेलॉइट यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तर रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, हिंडनबर्ग अहवालातील काही व्यवहारांबद्दलच्या चिंतेमुळे डेलॉइट यांनी अदानी पोर्ट्सच्या ऑडिटर पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तानुसार, अदानी पोर्ट्सशी संबंधित व्यवहारांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यास सांगितल्यानंतर डेलॉइट यांनी हा निर्णय घेतला. यामुळेही अदानींच्या शेअर्सना फटका बसल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

आशियाई बाजारातही घसरण दिसून आली. जपानचा टॉपिक्स, हाँगकाँगचा हँगसेंग, शांघाय कंपोझिट हे निर्देशांक घसरले. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

Back to top button