ब्रिटिश राजवटीने घेतला १० कोटी भारतीयांचा बळी – नव्या संशोधनातील दावा | पुढारी

ब्रिटिश राजवटीने घेतला १० कोटी भारतीयांचा बळी - नव्या संशोधनातील दावा

British Raj Killed 100 Million Indians : ब्रिटश कालखंड ही शोकांतिक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटिश राजवटीत १८८० ते १९२० या ४० वर्षांच्या कालखंडात तब्बल १० कोटी भारतीयांचा मृत्यू झाला होता आणि यासाठी फक्त ब्रिटिश धोरण जबाबदार होते असा निष्कर्ष दोन संशोधकांनी काढला आहे. ब्रिटिशांनी यासाठी भारताची भरपाई केली पाहिजे असेही या संशोधकांनी म्हटले आहे. (British Raj Killed 100 Million Indians)

डायलन सुलिवन आणि जेसॉन हिकेल यांनी या संदर्भातील एक लेख अल जजिरा या वेबसाईटवर लिहिलेला आहे. हा लेख २ डिसेंबर २०२२चा आहे. सुलिवन हे Macquarie University मध्ये फेलो आहेत. तर हिकेल हे रॉयल सोसायटी ऑफ आर्टमध्ये प्राध्यापक आहेत. ब्रिटिशांमुळे भारत आणि इतर वसाहतींच्या देशांत समृद्धी आली असा दावा काही संशोधक करत असतात, हा दावा खोडून काढण्याचे काम सुलिवन आणि हिकेल यांनी त्यांच्या संशोधनातून केला आहे.

ब्रिटिश राजवटीत भारतीय मृत्युदर वाढला | British Raj Killed 100 Million Indians

या लेखात ते म्हणतात, “ब्रिटिश साम्राज्याचे सुंदर चित्र रेखाटले जाते. पण वस्तुस्थिती तशी नाही. आर्थिक इतिहासाचे तज्ज्ञ रॉबर्ट अॅलन यांनी भारतात टोकाच्या गरिबीचे प्रमाण १८१०मध्ये २३ टक्के होते, ते ब्रिटिश काळात ५० टक्के झाले असे म्हटलेले आहे. ब्रिटिश काळात भारतातील वेतन घटले, ते अगदी निचतम पातळीवर पोहोचले होते. दुष्काळांची संख्या आणि त्यांची तीव्रता ही वाढली. वसाहतवादाचा भारताला कोणताही फायदा झाला नाही, ती एक मानवी शोकांतिक होती, अशा प्रकारचे मानवी संकट इतिहासात क्वचितच पाहायला मिळते.”

१८८०ला भारतात पहिली जनगणना झाली. १८८०ला भारतातील मृत्युदर ३७.१ टक्के होता, म्हणजेच १ हजार लोकसंख्येमागे ३७.२ लोकांचा मृत्यू होत होता, पण ही हाच मृत्युदर १९१०मध्ये ४४.२ टक्के इतका वाढला होता. तर सरासरी जीवनमान २६.७ वर्षांवरून २१.९ वर्षांवर आले होते.

भारत युरोपच्या बरोबरीने होता | British Raj Killed 100 Million Indians

या चाळीस वर्षांचा उल्लेख संशोधकांनी ‘निष्ठुर वर्षं’ असा केला आहे. अॅलन आणि इतर काही तज्ज्ञांच्या मते वसाहतीच्या पूर्वी भारतातील जीवनमान पश्चिम युरोपच्या बरोबरीचे होते. जर हे सत्य मानले तर १६व्या आणि १७व्या शतकात भारतातील मृत्युदर २७.१८ इतका असेल. त्यामुळे भारतात १८८१ ते १९२० या काळात १६.५ कोटी जादा मृत्यू झाले. मृत्यूचा नक्की आकडा सांगणे कठीण असले तरी जवळपास १० कोटी लोकांचा अकाली मृत्यू हा ब्रिटिश राजवटीत झाला, आणि तो ब्रिटिशांच्या धोरणामुळेच झाला, असे या संशोधकांनी ठामपणे म्हटले आहे. सोव्हिएट रशिया, चीन, उत्तर कोरिया, कंबोडिया, इथिओपिया येथील सर्व दुष्काळांतील मृतांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षाही ही संख्या जास्त आहे.

भारतातील उद्योग बंद पाडले

ब्रिटिशांना भारतातील निर्मिती उद्योग बंद पाडले, याचा ब्रिटिश उद्योगांना फायदा झाला, आणि भारतीय लोक गरिबीच्या खाईत ढकलले गेले. भारताची कायदेशीर मार्गाने लूट केली गेली. ब्रिटिशांनी भारतीयांवर कर लादले आणि कराच्या पैशातून भारतातूनच कच्चा माल विकत घेतला, हा माल ब्रिटनमध्ये वापरला जायचा किंवा तो तेथून निर्यात व्हायचा. या पैशाचा वापर ब्रिटनच्या विकासासाठी आणि ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिकेतील वसाहतींवर खर्च केला जात असे.

भारतात दुष्काळ असतानाही भारतातून अन्नधान्य ब्रिटनला पाठवले जात असे, ब्रिटिशांच्या अशा धोरणामुळे १९व्या शतकात अनेक भारतीयांचा भुकेने मृत्यू झाला असे संशोधक सांगतात. वसाहतीच्या प्रशासकांना हे दिसत असतानाही ते भारतीयांच्या मृत्यूचे मूक साक्षीदार झाले होते आणि हे मृत्यू म्हणजे अपघात नव्हता.

दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने हॉलोकास्टच्या पीडितांना भरपाई दिली, त्यानंतर नामिबियालाही मदत दिली गेली. इतिहास बदलता येत नाही, ब्रिटिशांनी जे गुन्हे केले ते पुसताही येणार नाहीत, पण ब्रिटिशांमुळे वसाहतींच्या देशात जी वंचितता आणि असमानता निर्माण झाली, त्याची भरपाई केली जावी, न्यायासाठी ते आवश्यक आहे असे या लेखात म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button