Closing Bell | शेअर बाजार नरमला! सेन्सेक्स ३६५ अंकांनी घसरून बंद, जाणून घ्या आजच्या ट्रेडिंगमध्ये काय घडलं? | पुढारी

Closing Bell | शेअर बाजार नरमला! सेन्सेक्स ३६५ अंकांनी घसरून बंद, जाणून घ्या आजच्या ट्रेडिंगमध्ये काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : आरबीआयचे जाहीर झालेले पतधोरण आणि आशियाई बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार नरमला. सेन्सेक्स ३६५ अंकांनी घसरून ६५,३२२ वर बंद झाला. तर निफ्टी ११४ अंकांनी घसरून १९,४२८ वर स्थिरावला. आज बाजारात विक्रीचा जोर राहिला. फार्मा स्टॉकमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय पातळीवर PSU बँक निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला. तर फार्मा आणि बँक निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. ऑटो, एफएमसीजी, मेटल, ऑईल आणि गॅस प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किरकोळ घसरणीसह बंद झाले.

‘हे’ शेअर्स घसरले

सेन्सेक्स आज ६५,७२७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,३०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँकेचा शेअर २ टक्क्यांहून अधिक घसरून १,३९५ रुपयांवर आला. एनटीपीसीचा शेअर २ टक्के घसरून २१२ रुपयांवर आला. तर सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. एचसीएल टेकचा शेअर सेन्सेक्सवर टॉप गेनर राहिला. टायटन, पॉवर ग्रिड, रिलायन्स, टाटा स्टील हे शेअर्सही वाढले.

एचसीएल टेकचा शेअर वधारला

आयटी कंपनी एचसीएल टेकने अमेरिकेतील व्यावसायिक ग्राहकांसाठी नेटवर्क व्यवस्थापित करण्यासाठी व्हेरिझॉन कम्युनिकेशन्सकडून २.१ अब्ज डॉलरचे कंत्राट मिळवल्यानंतर शुक्रवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजचा (HCL Tech shares) शेअर ४.५ टक्क्यांनी वाढून १,१८७ रुपयांवर गेला. त्यानंतर हा शेअर १,१७२ रुपयांवर स्थिरावला.

IRCTC चीही चमकदार कामगिरी

आयआरसीटीसीचा (IRCTC shares) चा शेअर बीएसईवर शुक्रवारच्या ट्रेडमध्ये सुमारे ५ टक्के वाढून ६८० रुपयांवर पोहोचला. तिमाहीत त्याच्या ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल १७ टक्के वाढून १,००२ कोटी झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत आयआरसीटीसीच्या महसुलाचा आकडा ८५३ कोटी रुपये होता. या फर्मने जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत २३२ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षाच्या याच कालावधीतील नफ्याच्या तुलनेत (२४५ कोटी) ५ टक्के कमी आहे.

 हे ही वाचा :

Back to top button