PM Modi: भ्रष्टाचार, वंशवाद, तुष्टीकरणाला देश ‘भारत छोडो’ म्हणत आहे; पंतप्रधान मोदी यांचा विरोधी आघाडीला टोला | पुढारी

PM Modi: भ्रष्टाचार, वंशवाद, तुष्टीकरणाला देश 'भारत छोडो' म्हणत आहे; पंतप्रधान मोदी यांचा विरोधी आघाडीला टोला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचार, वंशवाद आणि तुष्टीकरणाला देश ‘भारत छोडो’ म्हणत आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ९) विरोधी ‘इंडिया’ आघाडीला उद्देशून लगावला. महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा संदर्भ देत मोदी यांनी ही टिप्पणी केली. यानिमित्ताने भाजपकडून एक अभियानही सुरु करण्यात आले असून ते २१ दिवस चालणार (PM Modi)  आहे.

९ ऑगस्ट १९४१ रोजी महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली होती. त्याला ८१ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधत मोदी यांनी भाजप खासदारांशी संवाद साधला. भ्रष्टाचार, वंशवाद आणि तुष्टीकरणाविरोधात देश आता एका सूरात बोलत आहे, असे मोदी याप्रसंगी म्हणाले. विरोधी आघाडीविरोधात भाजप खासदारांनी सोशल अभियान चालू करावे, असे निर्देशही मोदी यांनी दिले आहेत. दरम्यान १६ ऑगस्टरोजी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमादरम्यान ‘माझी माती, माझा देश’ अभियानाची घोषणा मोदी करणार असल्याचे समजते. (PM Modi)

भारत छोडो आंदोलनाचा संदर्भ देत मोदी पुढे म्हणाले की, आज आपल्यासमोर विकसित भारताच्या निर्मितीचे स्वप्न आणि संकल्प आहे. मात्र, काही वाईट गोष्टी याच्यात अडथळा ठरलेल्या आहेत. यामुळे भारत एका सुरात ‘भ्रष्टाचार भारत छोडो, वंशवाद भारत छोडो आणि तुष्टीकरण भारत छोडो’ असे म्हणत आहे. देशाच्या दृष्टीने या वाईट गोष्टी धोकादायक आहेत. प्रयत्न करुन आपण या वाईट गोष्टी निश्चितपणे संपवू, असा विश्वास आहे.

भाजप खासदारांची निदर्शने…

दरम्यान, भारत छोडो आंदोलनाचा संदर्भ देत भाजप खासदारांनी संसद भवनाच्या प्रांगणात विरोधी ‘इंडिया’ आघाडीविरोधात आंदोलन केले. यावेळी भ्रष्टाचार भारत छोडो…, परिवारवाद भारत छोडो…, तुष्टीकरण भारत छोडो…, अशा प्रकारच्या घोषणा भाजप खासदारांनी दिल्या.

हेही वाचा 

Back to top button