Rahul Gandhi | राहुल गांधी जाणार वायनाडला, खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतरचा पहिला दौरा | पुढारी

Rahul Gandhi | राहुल गांधी जाणार वायनाडला, खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतरचा पहिला दौरा

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) १२-१३ ऑगस्ट दरम्यान केरळमधील त्यांच्या वायनाड मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. लोकसभा खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतरचा त्यांचा वायनाडचा हा पहिला दौरा आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात केरळ काँग्रेसतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खासदारकी बहाल झालेल्या काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सोमवारी संसद भवनात काँग्रेस तसेच ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या खासदारांनी जोरदार स्वागत केले होते. तब्बल १३७ दिवसांनी गांधी यांचे सोमवारी संसदेत दाखल झाले.

गांधी यांच्या पुनरागमनामुळे काॅंग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा जोश काँग्रेस मुख्यालयातही पहावयास मिळाला. मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केली. काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन या निर्णयाचे स्वागत केले.

सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र मोदी आडनाव मानहानी प्रकरणात सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आधार गांधी यांच्यासमोर राहिला होता. अखेर गत आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला होता.

हे ही वाचा :

Back to top button