पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज बुधवारी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली. अमेरिका तसेच युरोझोन आणि चीनच्या कमकुवत आर्थिक डेटाने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स आज सकाळी ११.४० च्या सुमारास ७०० अंकांनी घसरून ६५,७५८ वर आला. तर निफ्टी २०९ अंकांनी घसरून १९,५२३ पर्यंत खाली आला. सेन्सेक्स आणि निफ्टीची ही घसरण प्रत्येकी १ टक्के आहे.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, एल अँड टी, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स घसरले. केवळ हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स हे शेअर्स वाढले आहेत.
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाकडून ११५.८ कोटी उत्पादन शुल्काची नोटीस मिळाल्यानंतर सुला विनयार्ड्सचे शेअर्स ६ टक्क्यांनी खाली आले. या आदेशाचा सध्याच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हिरो मोटोकॉर्पचा शेअर ३ टक्क्यांनी खाली आला आहे. हिरो मोटोकॉर्पची एकूण विक्री जुलैमध्ये ३,९१,३१० युनिट्स झाली आहे. जी मागील वर्षी याच महिन्यात ४,४५५८० युनिट्स होती.
जागतिक बाजारावर नजर टाकल्यास अमेरिकेतील शेअर बाजार मंगळवारी घसरून बंद झाले. एस अँड पी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज, नॅस्डॅक हे निर्देशांक घसरले आहेत. अमेरिकेच्या बाजारातील या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातही घसरण झाली. सकाळच्या व्यवहारात जपानचा बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक १.८ टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी १.१ टक्के घसरला. हाँगकाँगचा हँग सेंग १.५ टक्के घसरला, तर शांघाय कंपोझिट ०.५ टक्के खाली आला.
NSE डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) मंगळवारी निव्वळ आधारावर ९२.८५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) १,०३६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
हे ही वाचा :