Priyanka Gandhi : अमित शहांना दुर्बिणीची नाही तर चष्‍म्‍याची गरज : प्रियांका गांधींचा हल्‍लाबोल | पुढारी

Priyanka Gandhi : अमित शहांना दुर्बिणीची नाही तर चष्‍म्‍याची गरज : प्रियांका गांधींचा हल्‍लाबोल

गोरखपूर : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशमध्‍ये गुन्‍हे आणि गुन्‍हेगारांना शोधण्‍यासाठी दुर्बीणची आवश्‍यकता भासते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्‍हणतात. मात्र अमित शहा स्‍वत: लखीमपूर खेरी हिंसाचारावेळी उपस्‍थित असणारे केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजय मिश्रा यांच्‍याबरोबर व्‍यासपीठावर बसतात. यावरुनच त्‍यांना दुर्बिणीची नाही तर चष्‍म्‍याची गरज आहे, अशा शब्‍दात काँग्रेसच्‍या महासचिव प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi : ) यांनी आज भाजपवर हल्‍लाबोल केला. उत्तर प्रदेशाच्‍या भाजप सरकारकडून सर्व वर्गांचे शोषण सुरु आहे. संपूर्ण राज्‍यात गुंडाराज सुरु आहे, असा आरोपही त्‍यांनी या वेळी केला. गौरखपूर येथे आयोजित प्रतिज्ञा रॅलीमध्‍ये त्‍या बोलत होत्‍या.

या वेळी प्रियांका गांधी म्‍हणाल्‍या, इंदिरा गांधी यांची आज पुण्‍यतिथी आहे. इंदिरा गांधी यांना माहित होते की, आपली हत्‍या होवू शकते. तरीही त्‍या कधीच घाबरल्‍या नाहीत. आज मी तुमच्‍यासमोर उभी आहे. याला सर्वसामान्‍य नागरिकांचा काँग्रेस पक्षावर असणारा विश्‍वासच कारणीभूत आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

( Priyanka Gandhi : )उत्तर प्रदेशमध्‍ये सर्वत्र गुंडाराज

उत्तर प्रदेशमध्‍ये ५ कोटींहून अधिक तरुण बेरोजगार आहेत. मात्र याची केंद्रासह उत्तर प्रदेश राज्‍य सरकारला जाणीवच नाही. उत्तर प्रदेशाच्‍या भाजप सरकारकडून सर्व वर्गांचे शोषण सुरु आहे. संपूर्ण राज्‍यात गुंडाराज आहे, असा आरोपही प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi : ) यांनी केला.

देशातील जनतेनेच केंद्र सरकारला जाब विचारावा

देशातील शेतकरी केंद्र सरकारच्‍या कायद्‍याविरोधात गेली अनेक महिने आंदोलन करत आहेत. मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्‍या उत्‍पन्‍न दुप्‍पटीने वाढेल, अशी ग्‍वाही दिली होती. मात्र हे केवळ आश्‍वासन राहिले. महागाईने सर्वसामान्‍य जनता होरपळत आहे. आता देशातील जनतेनेच केंद्र सरकारला जाब विचारायला हवा, असे आवाहनही त्‍यांनी केले.

महिला बदलतील राजकारणाचा चेहरामोहरा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ४० टक्‍के महिलांना उमेदवारी देणारा आहे. ४० टक्‍के महिला राजकारणात आल्‍या तर राजकारणाचा चेहरामोहरच बदलेल, अशा विश्‍वासही प्रियांका गांधी यांनी व्‍यक्‍त केला.

माझ्‍यासह काँग्रेस पक्ष सर्वसामान्‍य जनतेच्‍या हक्‍कांसाठी लढेल. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिलेल्‍या सर्व आश्‍वासनांची पूर्तता होईल. राज्‍यातील शेतकर्‍यांचे कर्ज पूर्ण माफ होईल. तसेच मुलींना शिक्षणासाठी दुचाकी दिली जाईल, या आश्‍वासनांचा पुनरुच्‍चारही या वेळी प्रियांका गांधी यांनी केला.

हेही वाचलं का? 

 

Back to top button