foreign exchange : विदेशी चलनसाठ्यात 908 दशलक्ष डॉलर्सची घट | पुढारी

foreign exchange : विदेशी चलनसाठ्यात 908 दशलक्ष डॉलर्सची घट

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : foreign exchange : भांडवली बाजारात विक्रीचा सपाटा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर 22 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या विदेशी चलन साठ्यात 908 दशलक्ष डॉलर्सची घट नोंदविण्यात आली आहे. विदेशी चलनसाठा आता 640.1 अब्ज डॉलर्सवर आला असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली. 15 ऑक्टोबर रोजीच्या आठवड्यात विदेशी चलनसाठ्यात 1.40 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदविण्यात आली होती. गत महिन्यात विदेशी चलनसाठा 642.45 अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर गेला होता.

22 ऑक्टोबर रोजीच्या आठवड्यात प्रामुख्याने विदेशी मुद्रा परिसंपत्तीमध्ये (एफसीए) घट झाली आहे. ही घट 853 दशलक्ष डॉलर्सची आहे. एकूण एफसीएचे प्रमाण आता 577.09 अब्ज डॉलर्सवर आले आहे. विदेशी मुद्रा परिसंपत्तीमध्ये युरो, पाऊंड, येन आदी चलनांचा समावेश होतो.

सोन्याच्या साठ्यात 138 दशलक्ष डॉलर्सची घट झाली असून हे साठे 38.44 अब्ज डॉलर्सवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्पेशल ड्राईंग राईट्समध्ये (एसडीआर) 74 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. एसडीआरचे प्रमाण आता 19.32 अब्ज डॉलर्सवर गेले आहे.

Back to top button