मी सीमा हैदरसारखी नाही, लवकरच भारतात परतणार : पाकिस्‍तानला गेलेल्‍या अंजूची स्‍पष्‍टोक्‍ती | पुढारी

मी सीमा हैदरसारखी नाही, लवकरच भारतात परतणार : पाकिस्‍तानला गेलेल्‍या अंजूची स्‍पष्‍टोक्‍ती

वाचा अंजूची सविस्तर मुलाखत | Anju Pakistan News

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील काही दिवस पाकिस्‍तानी नागरिक सीमा हैदरची लव्‍हस्‍टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. माझ्‍या प्रेमासाठी नेपाळमार्गे भारतात आल्‍याचा दावा ती करत आहे. आता सीमा हैदर प्रमाणेच राजस्‍थानमधील विवाहित महिला अंजूने आपल्‍या फेसबूक फ्रेंडला भेटण्‍यासाठी ‘सीमा’ ओलांडत पाकिस्‍तानमध्‍ये गेल्‍याचे उघड झाल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानमधील असे ‘एआरवाय न्यूज’ने दिले आहे. मात्र या वृत्तावर अंजूने नाराजी व्‍यक्‍त केली आहे. आपण सीमा हैदर नाही. मी कायदेशीररित्‍या पाकिस्‍तानला गेले आहे. लवकरच भारतात परतणार आहे, असे ‘इंडिया टूडे‘ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये तिने स्‍पष्‍ट केले आहे. जाणून घेवूया या मुलाखतीमधील प्रश्‍न-उत्तरे.

प्रश्न: अंजू, तुम्‍ही कुठे आहात ?

उत्तर: मी सध्‍या पाकिस्तानात आहे. हा मनालीसारखाच डोंगराळ प्रदेश आहे आणि मी इथे सुरक्षित आहे.

प्रश्न: पतीला याबाबत माहिती दिली होती का ?

उत्तर: नाही, मी कोणालाही काही सांगितले नाही. मी माझ्‍या पतीला जयपूरला प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते.

प्रश्न : पाकिस्तानमध्‍ये कशासाठी गेलात ?

उत्तर: मी पाकिस्‍तानला पर्यटन आणि एका विवाह समारंभाला उपस्‍थित राहण्‍यासाठी गेले आहे. मी सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले आहे.

प्रश्न : भिवडीहून पाकिस्तानात कसे पोहोचलात?

उत्तर : मी प्रथम राजस्‍थानमधील भिवडीहून दिल्लीला गेले. त्यानंतर अमृतसरवरुन वाघा बॉर्डरवर गेले. तिथून पाकिस्तानात प्रवेश केला.

प्रश्न : पाकिस्तानात कोणासोबत राहिलात?

उत्तर: येथे माझा एक मित्र आहे. आमचे एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले संबंध आहेत. दोन वर्षांपूर्वी आमची मैत्री झाली. पाकिस्‍तानमध्‍ये  एक लग्न होतं. त्यात सहभागी होण्यासाठी मी गेले आहे. त्‍याचबराेबर प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी इथे आले आहे. सीमा हैदरशी माझी तुलना करणे चुकीचे आहे. मी दाेन ते चार दिवसांनी भारतात परत येणार आहे. मी पाकिस्‍तानमध्‍ये पूर्णपणे सुरक्षित आहे.

प्रश्न : नसरुल्लासोबत लग्न करण्यासाठी तुम्ही पाकिस्तानात गेला होता का?

उत्तर: नाही, असे काही नाही. पाकिस्‍तानमधील माध्‍यमे अतिशयोक्ती करत आहे. मी सीमा हैदरसारखी नाही.

प्रश्न: नसरुल्लाबरोबर कशी ओळख झाली ?

उत्तर: नसरुल्‍ला याच्‍याबरोबर माझी 2020 मध्ये मैत्री झाली. कामानिमित्त मी फेसबुक वापरायला सुरुवात केली. फेसबूकवर आमची ओळख झाली. मी नसरुल्लाहशी बोलू लागले. आम्ही मोबाईल फोन नंबर एक्सचेंज करून व्हॉट्स अॅपवर बोलू लागलो. नसरुल्लाला मी दोन-तीन वर्षांपासून ओळखते. मी पहिल्याच दिवशी माझ्या बहिणीला आणि आईला याबद्दल सांगितले होते.

प्रश्न: तुम्हाला तुमच्या पतीपासून वेगळे व्हायचे आहे का?

उत्तर : होय. माझे माझ्‍या पतीशी सुरुवातीपासून चांगले संबंध नव्हते. माझ्‍या मुलांसाठी मला त्‍याच्‍याबरोबर राहावे लागले. म्हणूनच मी माझा भाऊ आणि वहिनींनाही सोबत आणले आहे. मधल्या काळात मला गुरुग्रामला नोकरीही लागली होती. नसरुल्लासोबत लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नाही. सध्या मी पाकिस्‍तानला पर्यटनासाठी आले आहे. मला भारतात परतायचे आहे आणि माझ्या मुलांसोबत माझ्या पतीपासून वेगळे राहायचे आहे.

प्रश्न: तुम्ही पाकिस्‍तानला जाण्यासाठी किती दिवसांची रजा घेतली?

उत्तर: मी माझ्या कामाच्या ठिकाणाहून 10 दिवसांची रजा घेऊन येथे प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आले आहे.तथापि, मी व्यवस्थापनाला सांगितले की, जर मला त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर ते इतर कोणाला तरी कामावर घेऊ शकतात.

प्रश्न: तुम्हाला भारतात परत यायचे आहे की त्यांच्यासोबत पाकिस्तानात राहायचे आहे?

अंजू: सध्या माझ्याकडे काही निश्चित योजना नाहीत. मी लवकरच परत येईन आणि भविष्यात मी काही निर्णय घेतल्यास मी याची माहिती देईन.

अंजूच्‍या खुलाशामुळे प्रकरणावर पडदा

राजस्‍थानमधील भिवडी जिल्‍ह्यातील अरविंद हा त्याची पत्नी अंजू आणि मुलांसह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.अंजू एका खाजगी कंपनीत बायोडेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करत होती. अंजूची पाकिस्‍तानच्‍या वायव्‍य खैबर पख्‍तुनख्‍वा प्रांतातील तरुण नसरुल्ला याच्‍याशी फेसबुकवर मैत्री झाली. तिने पती अरविंदला जयपूरमध्‍ये नातेवाईकांकडे जात असल्‍याचे सांगितले होते. यानंतर ती पाकिस्‍तानमध्‍ये असल्‍याचे वृत्त समोर आले.आता अंजूने केलेल्‍या खुलासामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे.

हेही वाचा: 

Back to top button